महत्वाच्या बातम्या

 जनता अवेक इंडिया संमेलनातून गडचिरोलीत बहुजन विचारांचा जागर : परिवर्तनाच्या लढ्याचा एल्गार


- २९ नोव्हेंबरला आयोजन; बहुजन विचारांच्या परिवर्तनवादी चळवळीला बळ देण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, आयोजकांचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : आदिवासी, अनुसूचित जाती, ओबीसी, अल्पसंख्याक, भटके-विमुक्त आणि तमाम बहुजन समाजाच्या संवैधानिक प्रश्नांवर व्यापक सार्वजनिक संवाद घडवून आणण्यासाठी लोकसंघ - सोशल एज्युकेशन मुव्हमेंट (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी गडचिरोली येथील यमुना लॉन, पोटेगाव रोड येथे प्रथम राज्यस्तरीय जनता अवेक इंडिया संमेलना चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईपासून भामरागडपर्यंतच्या विविध भागांतील कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी, लेखक, विचारवंत आणि नागरिक या संमेलनात सहभागी होणार आहेत.

महामानव जोतीबा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या संमेलनाला जनता च्या वैचारिक परंपरेचाही संदर्भ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या जनता पत्राने समाजाशी संवाद साधत परिवर्तनाच्या चळवळीला वैचारिक दिशा देण्याचे काम केले. त्याच परंपरेला पुढे नेत लोकसंघ गेल्या १३ वर्षांपासून अवेक इंडिया नियतकालिक प्रकाशित करत आहे. वाचक, लेखक, विचारवंत आणि कार्यकर्त्यांमध्ये संवाद घडवून आणणे आणि सामाजिक प्रश्नांवर सामूहिक विचार व कृतीला चालना देणे, हा या उपक्रमाचा हेतू आहे.

लोकसंघ–सोशल एज्युकेशन मुव्हमेंटची सुरुवात २०१० मध्ये झाली. फुले - शाहू - आंबेडकर यांच्या समतावादी विचारधारेतून प्रेरणा घेत, सामाजिक शिक्षण, संवैधानिक जागृती, सामूहिक नेतृत्व आणि लोकसंघटनेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी संघटना कार्यरत आहे. व्यक्तिकेंद्रित नेतृत्वाऐवजी सामूहिक नेतृत्व विकसित करणे आणि चळवळीला सातत्यपूर्ण दिशा देणारा लोकसंघ उभारणे, हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे.

भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, समता, मैत्री, न्याय आणि मानवी प्रतिष्ठेची हमी दिली आहे. मात्र, या मूल्यांचा प्रत्यक्ष लाभ सर्व समुदायांपर्यंत पोहोचला आहे का, हा प्रश्न संमेलनाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी असेल. विशेषतः आदिवासी समाजाच्या शिक्षण, आरोग्य, जल-जंगल-जमीन, मातृभाषा, संस्कृती, प्रतिनिधित्व, रोजगार आणि आर्थिक संसाधनांशी संबंधित प्रश्नांवर विचारमंथन होणार आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील अनुभव आणि प्रश्न व्यापक सार्वजनिक चर्चेचा भाग व्हावेत, तसेच स्थानिक युवकांना देशभरातील विचारवंत व सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधता यावा, हा संमेलनामागील महत्त्वाचा उद्देश आहे.

संमेलनात वैचारिक सत्रांसह जागर समतेचा शाहीरी जलसा, आदिवासी युवा संवाद आणि विविध मार्गदर्शनपर उपक्रम असतील. प्रसिद्ध रॅपर विपिन तातड आपल्या चमूसह सांस्कृतिक सादरीकरण करणार आहेत. त्यांच्या सादरीकरणातून अनुसूचित जाती, आदिवासी, इतर मागासवर्गीय, भटके-विमुक्त आणि इतर वंचित समुदायांचा इतिहास, संघर्ष व सांस्कृतिक वारसा, तसेच फुले–शाहू–बिरसा–आंबेडकर यांचे विचार आणि संवैधानिक मूल्ये मांडली जाणार आहेत.

संमेलनाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जितेंद्र मीणा, मा. दशरथ मडावी, अ‍ॅड. प्रियदर्शी तेलंग, मा. प्रशांत रणदिवे, डॉ. संतोष सुरडकर आणि मा. संदीप तंडोलकर उपस्थित राहणार आहेत. आदिवासी युवा संवादक म्हणून तनुज पेंदोर आणि साधना मडावी सहभागी होतील. संमेलनाचे अध्यक्षपद अ‍ॅड. बोधी रामटेके भूषवतील.

संमेलनस्थळी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन, उच्च शिक्षणविषयक माहिती, वनहक्क पट्ट्यांसंदर्भात मदत, पुस्तकविक्री, बांबू हस्तकला, पारंपरिक वस्तू आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही असतील. तसेच, समाजपरिवर्तनाच्या विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या दहा मान्यवरांना जनता अवेक इंडिया पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, पत्रकार आणि प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्तींसाठी संमेलनस्थळी स्वतंत्र मीडिया पॉइंट असेल. या माध्यमातून त्यांना विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा, मुलाखती आणि संवाद साधता येईल.

लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, विद्यार्थी, कामगार, युवक आणि समस्त नागरिकांनी संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीचे शाम रामटेके, धर्मानंद मेश्राम, देवेन्द्र सोनपिपरे, विनोद मडावी, ऍड. नभा शेंडे, राज बन्सोड, ऐश्वर्या खंडागळे, सुरेंद्र वासनिक, सुधा चौधरी, अलका गुरनुले, वामनराव गुरनुले, मोहन मोटघरे, देवेंद्र मेश्राम, प्रतिक डांगे, सतीश दुर्गमवार आदी. उपस्थित होते.





  Print






Related Photos