महत्वाच्या बातम्या

 अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून विनयभंग : ५० वर्षीय आरोपीला न्यायालयीन कोठडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : घरात घुसून अल्पवयीन मुलीच्या शेजारी झोपत तिच्याशी गैरवर्तन केल्याची गंभीर घटना बल्लारपूर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी ५० वर्षीय आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित १४ वर्षीय मुलगी आपल्या परिवार सह बल्लारपूर परिसरात राहते. २ सप्टेंबर रोजी रात्री जेवण झाल्यानंतर तिचा भाऊ कामावर गेला, तर पीडित मुलगी आणि तिची बहिण घरातील एका बेडवर झोपल्या. घराच्या मुख्य दरवाजाला कुंडी नसल्याने दरवाजा केवळ ढकलून ठेवण्यात आला होता.

३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास पीडित मुलीला आपल्या शेजारी बहिणीव्यतिरिक्त अन्य व्यक्ती झोपल्याचे जाणवले. तिने डोळे उघडून पाहिले असता शेजारी राहणारा आरोपी असल्याचे दिसले. तिने आरडाओरड करताच तिची बहिण जागी झाली. त्यानंतर आरोपी उठून घराच्या दरवाजातून पळून गेला.

घटनेनंतर दोन्ही बहिणींनी भावाला प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती देण्यात आली. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.

पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे करीत आहेत.





  Print






Related Photos