वोट बचाओ, देश बचाओ अभियानासाठी आ. बाला बच्चन यांचा चंद्रपूर दौरा : २५ ऑक्टोबरला काँग्रेसची बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : लोकशाहीचे संरक्षण, मतदारांच्या हक्कांविषयी जनजागृती आणि काँग्रेस संघटनेच्या बळकटीकरणासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानांतर्गत मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री तथा आमदार बाला बच्चन हे २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या आ. बच्चन यांच्या उपस्थितीत २५ ऑक्टोबरला चंद्रपुरात काँग्रेसची कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली आहे.
रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता हॉटेल सिद्धार्थ प्रीमियम येथे चंद्रपूर शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या वतीने ही बैठक होणार आहे. या बैठकीत ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानाची अंमलबजावणी, मतदारांच्या हक्कांविषयी जनजागृती, पक्ष संघटनेचे बळकटीकरण आणि आगामी कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे.
या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विद्यमान व माजी लोकप्रतिनिधी, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, तालुका पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल तसेच पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे आणि शहर जिल्हाध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांनी केले आहे.
लोकशाही मूल्यांचे रक्षण, मतदारांच्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि काँग्रेस संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियान यशस्वी करावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.




Petrol Price




