जुगार अड्ड्यावर ठाणे गावात पोलिसांची धाड


- सार्वजनिक रस्त्यावर विद्युत खांबाच्या प्रकाशात सुरू होता जुगार; एक जण ताब्यात, सहा पसार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : तालुक्यातील ठाणेगाव येथे सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर आरमोरी पोलिसांनी धाड टाकून एका जुगाऱ्याला ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान सहा जण पोलिसांना चकवा देत पसार झाले. ही कारवाई ११ सप्टेंबर रोजी रात्री करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणेगाव येथील माराई मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर विद्युत खांबाच्या प्रकाशात काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना डायल-११२ वरून मिळाली. माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. यावेळी प्रशांत भरणे ३० वर्ष, रा. रांगी, ता. आरमोरी हा पोलिसांच्या हाती लागला, तर अक्षय हामले, शुभम दुधबळे, युवराज धकाते, प्रकाश भोयर, सागर रॉय आणि मनोज नैताम हे सहा जण घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी आरमोरी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.




Petrol Price




