महत्वाच्या बातम्या

 घरात घुसला, तरुणीला मारहाण करून बेडरूममध्ये डांबले : २४ तासांत आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कॉलेजमधून घरी परतलेल्या तरुणीला घरात अनोळखी व्यक्ती दिसली आणि काही क्षणांतच तिच्यावर भीतीचे सावट पसरले. आरडाओरड केल्याने आरोपीने तिचा हात पकडून तिला बेडरूममध्ये ढकलून दिले. दुखापत झालेल्या तरुणीला बेडरूममध्ये बंद करून आरोपीने घरातील पाच हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. या धक्कादायक जबरी चोरीच्या घटनेचा वरोरा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत १९ वर्षीय आरोपीला अटक केली.

३० सप्टेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास फिर्यादीची मुलगी कॉलेजमधून घरी परतली. घराच्या वॉलकंपाउंडचे गेट बंद असतानाही घराचा दरवाजा उघडा असल्याचे तिला दिसले. संशय आल्याने ती घरात गेली असता बेडरूमच्या दरवाजाजवळ तोंडाला दुपट्टा बांधलेला अनोळखी इसम उभा असल्याचे तिच्या निदर्शनास आले. अचानक समोर आलेल्या व्यक्तीला पाहून घाबरलेल्या तरुणीने आरडाओरड केली.

तिच्या आरडाओरडीनंतर आरोपीने तिचा हात पकडून ओढले आणि बेडरूममध्ये ढकलून दिले. या झटापटीत तिच्या डाव्या हाताच्या कोपराला आणि करंगळीला दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद करून तिला आतमध्ये डांबून ठेवले आणि तेथून पळ काढला. काही वेळाने शेतातून घरी परतलेल्या आई-वडिलांना घराचा दरवाजा उघडा दिसला. बेडरूममधून मुलीचा आवाज ऐकू आल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडून तिला बाहेर काढले.

यानंतर घरातील कपाटाची पाहणी केली असता त्यामधील पाच हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे आढळून आले. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. फिर्यादीच्या तक्रारीवरून वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १००४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१ (३) व ३०९ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या आदेशाने तपास पथकाने आरोपीचा शोध सुरू केला.

तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रज्वल प्रमोद झिले वय १९ वर्ष रा. टेमुर्डा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी त्याला अटक करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल आणि पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनिष तालेवार, पोलीस हवालदार संदीप मुळे, प्रशांत नागोसे, पोलीस अंमलदार विशाल राजुरकर, मनोज ठाकरे, अमोल नवघरे, सौरभ कुलथे, सुखराज यादव





  Print






Related Photos