महत्वाच्या बातम्या

 सराईत गुन्हेगारांना हद्दपारीचा दणका : ब्रह्मपुरीतील चार जणांवर तडीपारीची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : अवैध दारू विक्री आणि सट्टापट्टी-जुगाराच्या माध्यमातून परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील चार सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. उपविभागीय दंडाधिकारी, ब्रह्मपुरी यांनी चारही गुन्हेगारांना पुढील एक महिन्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश १९ ऑगस्ट २०२६ रोजी पारित केला. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये संजय मधुकर लांजेवार ५२, रा. फुलेनगर, ब्रह्मपुरी , सुरज नामदेव बगमारे ३७, रा. बोंडेगाव हुलकी, ब्रह्मपुरी, कमलसिंग मायासिंग जुनी २५, रा. मेंडकी, ता. ब्रह्मपुरी आणि वैभव ऊर्फ गोलू नानाजी राउत (३०, रा. गणेशपूर, ता. ब्रह्मपुरी) यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित आरोपींविरुद्ध अवैध दारू विक्री तसेच सट्टापट्टी व जुगारासंदर्भात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात अपेक्षित सुधारणा झाली नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यांच्या कथित कारवायांमुळे परिसरात अशांतता निर्माण होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याच्या तक्रारीही पोलिस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी संबंधित गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या प्रकरणांची कागदपत्रे व पुरावे संकलित करून हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, ब्रह्मपुरी यांच्याकडे सादर करण्यात आला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चारही जणांना चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतून एक महिन्याच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचा आदेश देण्यात आला.

आदेशाची अंमलबजावणी करत पोलिसांच्या शोधपथकाने चारही जणांना ताब्यात घेत चंद्रपूर जिल्ह्याबाहेर रवाना केले. या कारवाईमुळे अवैध दारू विक्री व सट्टा-जुगाराच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याच्या पोलिसांच्या भूमिकेला बळ मिळाले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी साहील झरकर आणि पोलिस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज खडसे यांच्यासह पोलिस हवालदार मुकेश गजबे, मिलिंद नैताम, पोलिस अंमलदार प्रविण भिवगडे, इरशाद खान, निलेश तुमसरे, स्वप्नील पळसपगार व वशिष्ट रंगारी यांनी कारवाईत सहभाग घेतला.

चारही सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केल्याने ब्रह्मपुरी परिसरातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत केले आहे. आगामी काळातही अवैध दारू विक्री, सट्टा-जुगार आणि गुन्हेगारी प्रवृत्तींविरुद्ध अशीच कठोर कारवाई सुरू ठेवण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos