महत्वाच्या बातम्या

 सावली तालुक्यात पुन्हा हत्तींचा कळप : करोली-आकापूर परिसरात सतर्कतेचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गडचिरोलीकडून वैनगंगा नदीमार्गे सावली तालुक्यात दाखल होणाऱ्या जंगली हत्तींच्या कळपाने पुन्हा एकदा सावली तालुक्यातील करोली, आकापूर आणि गेवरा परिसरात प्रवेश केला आहे. हत्तींचा कळप परिसरात दाखल झाल्याने शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने परिस्थितीवर लक्ष ठेवत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली आणि सावली तालुक्याच्या परिसरात वैनगंगा नदी ओलांडून हत्तींच्या कळपाचा वावर सुरू आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी तब्बल ३२ हत्तींचा कळप जवळपास महिनाभर सावली तालुक्यात होता. या कालावधीत सोनापूर येथील एका व्यक्तीचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तसेच हत्तींच्या संचारामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

आता पुन्हा हत्तींच्या कळपाने तालुक्यात प्रवेश केल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हत्तींचा कळप सध्या कोणत्या दिशेने पुढे सरकतो, यावर वनविभागाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. हत्तींच्या हालचालींची माहिती मिळताच वनकर्मचाऱ्यांकडून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.

वनविभागाने करोली, आकापूर, गेवरा तसेच लगतच्या परिसरातील नागरिकांना हत्तींपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. हत्ती दिसल्यास त्याच्या जवळ जाणे, त्याला हुसकावणे किंवा त्याच्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण करणे टाळावे. हत्तींच्या संचाराच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अनावश्यकपणे जाणे टाळावे, तसेच हत्तींची माहिती तात्काळ वनकर्मचाऱ्यांना किंवा वनविभागाला द्यावी, असे आवाहन सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी केले आहे.





  Print






Related Photos