नागपूर-मडगाव एक्स्प्रेस : विदर्भ आणि गोव्याला थेट रेल्वे कनेक्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : विदर्भ, कोकण आणि गोवा या भागांना थेट रेल्वेने जोडण्याच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. नागपूर आणि मध्य भारताच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला गती देत, सेंट्रल रेल्वेच्या नागपूर विभागाने गाडी क्रमांक ११२०३/११२०४ नागपूर-मडगाव एक्स्प्रेस नियमित सेवा सुरू केली आहे. याआधी ही गाडी विशेष ट्रेन (TOD Special) म्हणून चालवली जात होती, परंतु आता रेल्वे बोर्डाने ती कायमस्वरूपी नियमित केली आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या गाडीचा अधिकृत शुभारंभ पार पडला.
नागपूर रेल्वे स्थानकावर दिमाखदार सोहळा -
नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर दुपारी २:३० वाजता उद्घाटन सोहळा पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवी झेंडी दाखवून गाडी मार्गस्थ केली. सोहळ्यात रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार विकास ठाकरे, आमदार प्रवीण दटके, परिणय फुके, कृपाल तुमाने, सुधाकर अडबाले, तसेच नागपूरच्या महापौर नीता ठाकरे उपस्थित होते. याशिवाय रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते.
रेल्वेचे वेळापत्रक आणि मार्ग -
ही गाडी आठवड्यातून दोन दिवस (Bi-weekly) धावणार असून वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:
गाडी क्र. ११२०३ (नागपूर → मडगाव): १६ मे २०२६ पासून दर बुधवार व शनिवारी दुपारी १५:०५ वाजता नागपूरहून सुटेल, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:४५ वाजता मडगाव स्थानकावर पोहोचेल.
गाडी क्र. ११२०४ (मडगाव → नागपूर): १७ मे २०२६ पासून दर गुरुवार व रविवारी रात्री २०:०० वाजता मडगावहून सुटेल, दुसऱ्या दिवशी रात्री २१:२५ वाजता नागपूर पोहोचेल.
प्रमुख थांबे: वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी.
पर्यटन आणि व्यापाराला नवी भरारी -
विदर्भ आणि गोव्यादरम्यान थेट रेल्वे सेवेचा नियमितीकरण हा मोठा निर्णय ठरला आहे. यामुळे पर्यटनाला आणि प्रादेशिक व्यापाराला मोठी चालना मिळणार असून, विदर्भातील जनतेचे थेट गोव्याला जाण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी अधिक आरामदायी आणि सुटसुटीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
News - Nagpur




Petrol Price




