घाटंजी तालुक्यातील झटाळा, मारेगाव व घोटी येथील तलावतील गाळ उपसा न करता देयके काढल्याचा गंभीर आरोप


- जलसन्धारण विभागात कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार
विदर्भ न्युज एक्सप्रेस
अयनुद्दीन सोलंकी / घाटन्जी : घाटंजी तालुक्यात धरणाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढून तो शेतजमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उपलब्ध करून देणे हा गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा मुख्य उद्देश ठेवून शासन स्तरावरून लाखो रुपये खर्ची घालून ही योजना राबविल्या जात असून याला घाटंजी तालुक्यातील झटाळा, घोटी, मारेगाव येथील तलावात केवळ गाळ उपासण्याचे उदघाट्न करण्याचा देखावा करून गाळ न उपसता देयके लाटण्याचा आरोप करून, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याची लेखी तक्रार ऍड. निलेश चवरडोल (घाटन्जी) यांनी केली आहे.
संबंधित तलावाचे काम यवतमाळ येथील बहुउद्देशीय संस्थेला दिले गेले असून केवळ देखावा करण्याच्या दृष्टीने थातूर - मातुर उदघाट्नाचे सोपस्कार करण्यात आले. नंतर या ठिकाणी ना बहुउद्देशीय संस्थेचे कर्मचारी फिरकले, ना गाळ उपसा करणारी मशीन आली. या शिवाय गंभीर असे की, शासनाचे प्रतिनिधी असलेले अधिकारी वा कर्मचारी अथवा कोणताही अधिकारी फिरकून किती गाळ उपसा झाला, कोणत्या शेतकऱ्याला गाळ देण्यात आले, याची चौकशी सुद्धा केली नसल्याचे लेखी तक्रारीत म्हटले असून केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी एका तलावा मागे ४० ते ५० लाख रुपयाचे देयके कसे लाटता येईल यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. तलावातील गाळ उपसून गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, ही बाब सोडून शासनाच्या निधीचा भ्रष्टाचारयुक्त तलाव युक्ती वापरून शासनाच्या निधीचा उपसा करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मौजा झटाळा येथील तलावाच्या गाळ उपसण्याचे उदघाट्न २८ मार्च २०२५ रोजी करण्यात आले. ज्याचे जिओ टॅग फोटो सुद्धा उपलब्ध आहे.
मात्र गाळ उपसा करण्याचे काम पावसाळा संपल्यानंतर २५ सप्टेंबर २०२५ अर्थात सहा महिन्यानंतर झाल्याचे जिओ टॅग उपलब्ध आहे. या गंभीर बाबीची माहिती, घाटन्जी येथील जलसन्धारण विभागाला माहितीच्या अधिकारात मागितली असता, अर्जदाराला माहिती देण्याचे टाळले. आपल्या विभागाचे पितळ उघडे पडेल म्हणून माहिती नाकारण्यात आली आहे. तसेच भ्रष्टाचार बाहेर निघेल या भितीने माहिती देण्यात आलेली नाही, अशी शंका या ठिकाणी उपस्थित होत आहे.
त्यामुळे पावसाला सुरुवात होण्यापूर्वी झटाळा, घोटी, मारेगाव या तलावाची प्रत्यक्ष व समक्ष चौकशी व्हावी व झालेल्या अफरातफरीची, भ्रष्टाचाराची चौकशी करून, ज्या यवतमाळ येथील बहुउद्देशीय संस्थेला काम दिले गेले त्यांचेवर व यातील भ्रष्टाचार युक्त बाबीला खतपाणी घालणारे सबन्धित जलसंधारण विभागाचे उप अभियंता व समब्धित जलसंधारण अधिकारी यांचेवर तात्काळ फौजदारी कारवाई करावी, अशी तक्रार घाटंजी येथील ऍड. निलेश चवरडोल यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आर्णीचे आमदार प्रा. राजू तोडसाम व इतरांना लेखी तक्रारीतून केली आहे.
घाटन्जी येथील मृद व जलसन्धारण विभागाचे उप अभियंता आशिष तिमसे यांचेशी सम्पर्क केला असता, मी सद्या मुंबई येथील मन्त्रालयात आहे. मी नन्तर फोन वर बोलतो. असे म्हणून बोलण्यास नकार दिला. तसेच प्रतिक्रीया देण्यास सुद्धा त्यान्नी नकार दिला.
News - Rajy




Petrol Price




