महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर रेल्वे स्थानकावरील मोबाईल चोरीचा गुन्हा अवघ्या सहा तासांत उघड : आरोपी गजाआड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर रेल्वे स्थानकावरील बुकिंग ऑफिस हॉलमध्ये झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपी अक्षय यशवंत कांबळे (वय २०), रा. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ, दहेगाव, पो. तांडा, ता. आमगाव, जि. गोंदिया याला रेल्वे पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक केली. आरोपीकडून २० हजार ९९९ रुपये किमतीचा सिल्व्हर रंगाचा OnePlus Nord CE ४ Lite मोबाईल जप्त करण्यात आला असून हा मोबाईल रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

रविवारी १३ जुलै रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता चंद्रपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील बुकिंग ऑफिस हॉलमध्ये झोपलेल्या एका प्रवाशाच्या खिशातून मोबाईल चोरी झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल (RPF) चंद्रपूरचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक संशयित इसम प्रवाशाच्या शेजारी झोपून त्याच्या पॅन्टच्या खिशातून मोबाईल काढताना स्पष्टपणे दिसून आला.

सीसीटीव्हीतील वर्णनाच्या आधारे पोलीस शिपाई निलेश निकोडे (एलसीबी लोहमार्ग नागपूर), पोलीस शिपाई अखिलेश चौधरी (डीबी पथक, रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा), तसेच रेल्वे सुरक्षा बल चंद्रपूरचे एएसआय सचिन नागपुरे व आरक्षक सुमित जांगडा यांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. चंद्रपूर रेल्वे स्थानक परिसरात शोध घेत असताना संशयिताला चंद्रपूर बसस्थानकासमोर घेराव घालून ताब्यात घेण्यात आले.

आरोपीच्या अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून चंद्रपूर-शेगाव प्रवासाचे रेल्वे तिकीट तसेच सिल्व्हर रंगाचा OnePlus Nord CE ४ Lite मोबाईल आढळून आला. चौकशीदरम्यान त्याने रेल्वे स्थानकातील बुकिंग ऑफिसमध्ये झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.

पुढील तांत्रिक तपासात जप्त मोबाईलचा आयएमईआय क्रमांक तपासण्यात आला असता तो रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक १९१/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत चोरीस गेलेला मोबाईल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीसह जप्त मोबाईल पुढील कायदेशीर कारवाईसाठी रेल्वे पोलीस चौकी बल्हारशाह येथे सुपूर्द करण्यात आला.

या कारवाईमुळे रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे नोंद असलेला चोरीचा गुन्हा अवघ्या सहा तासांत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई लोहमार्ग नागपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. मंगेश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक पंजाबराव डोळे, रेल्वे पोलीस स्टेशन वर्धाचे प्रभारी पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे आणि आरपीएफ चंद्रपूरचे थाना प्रभारी बलवीर सिंह यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

दरम्यान, रेल्वेने प्रवास करताना स्थानक परिसरात झोपू नये तसेच आपल्या मौल्यवान वस्तू आणि सामानाची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos