पहिल्याच पावसात राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था : गुंडेरा-मोसम रपटे वाहून गेल्याने सिरोंचाचा संपर्क तुटला

- जिम्मलगट्टा व सिरोंचा व आलापल्ली येथे तातडीने हेलिकॉप्टर सेवा सुरू करा – संतोष ताटीकोंडावार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आलापल्ली : आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सीवरील कामांची संथ गती आणि नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा पहिल्याच पावसात उघड झाला आहे. गुंडेरा व मोसम येथील रपटे वाहून गेल्याने सिरोंचा तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला असून हजारो नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिम्मलगट्टा व सिरोंचा व आलापल्ली येथे तातडीने हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.
गेल्या सहा वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प असतानाही अद्याप अनेक ठिकाणी कायमस्वरूपी पूल पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे दरवर्षी पावसाळा सुरू होताच नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी याच समस्येवर अनेकदा आवाज उठवला होता. महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी जनतेला सोबत घेऊन मोठे आंदोलन उभारले होते. मात्र त्या आंदोलनाची आणि नागरिकांच्या मागणीची वेळेत दखल घेण्यात आली असती, तर आज अहेरी व सिरोंचा तालुक्यातील जनतेवर ही परिस्थिती ओढवली नसती, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पहिल्याच पावसात गुंडेरा व मोसम येथील रपटे वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी आणि व्यापारी अडकून पडले आहेत. विशेषतः गरोदर माता, गंभीर रुग्ण आणि अत्यावश्यक सेवांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, ही तर पावसाळ्याची केवळ सुरुवात आहे. अजून जवळपास दोन महिने पावसाळा शिल्लक आहे. जर आताच अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर पुढील काळात नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था उभारून नागरिकांना दिलासा द्यावा.
तसेच त्यांनी जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य शासनाने तातडीने या मार्गाची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी संपर्क तुटण्याच्या समस्येमुळे अहेरी व सिरोंचा तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र संताप असून आता केवळ आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
चार वर्षे संथ गतीने सुरू असलेल्या कामाची किंमत आज सर्वसामान्य जनता मोजत आहे. पहिल्याच पावसात संपर्क तुटत असेल तर विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




