महत्वाच्या बातम्या

 शेगाव टोली परिसरातील अवैध दारूविक्री बंद करा! 


- नागरिकांचे आरमोरी पोलिसांना निवेदन; युवकांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : शहरातील शेगाव टोली, बीएसएनएल टॉवर तसेच पालोरा रोड परिसरात मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली अवैध दारूविक्री तातडीने बंद करण्यात यावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या मागणी संदर्भात नागरिकांनी आरमोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन झनक यांना निवेदन सादर केले. अवैध दारूविक्रीमुळे परिसरातील सामाजिक वातावरण दूषित होत असून, युवक आणि लहान मुले व्यसनाच्या विळख्यात सापडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शेगाव टोली, बीएसएनएल टॉवर आणि पालोरा रोड परिसरात मागील कित्येक वर्षांपासून दारूविक्री सुरू असल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे. या दारूविक्रीमुळे परिसरातील अनेक युवक तसेच मुले दारूच्या आहारी जात असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. कमी वयातच व्यसनाधीनतेकडे वळणाऱ्या युवकांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भवितव्यावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने या प्रकाराला वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

महिला व सर्वसामान्य नागरिकांना त्रास -
दारूच्या व्यसनामुळे परिसरातील महिला, बालके आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. परिसरातील शांतता आणि सुरक्षिततेवरही याचा परिणाम होत असून, सामाजिक वातावरण बिघडण्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या या समस्येकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

अवैध दारूविक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी -
परिसरातील नागरिकांच्या हिताचा विचार करून शेगाव टोली, बीएसएनएल टॉवर आणि पालोरा रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीची गांभीर्याने दखल घ्यावी. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी आणि परिसरातील अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद करावी, अशी मागणी नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

यावेळी पोलिस निरीक्षक सचिन झनक यांना निवेदन देताना नानाजी झोडगे, रोहित कांबळे, निलेश अंबादे, अतुल चोपकर, भूपेश वाकडे, नितीन सोमनकर, बादल बांबोळे आदी नागरिक उपस्थित होते. परिसरातील युवकांचे भविष्य सुरक्षित राहावे, महिला व बालकांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि सामाजिक शांतता कायम राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन तातडीने आवश्यक पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.






  Print






Related Photos