चांदा फोर्टवरून धावणाऱ्या गाड्यांच्या विलंबाची आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली दखल : रेल्वे प्रशासनाकडून सविस्तर स्पष्टीकरण


प्रवाशांच्या तक्रारीनंतर आ. मुनगंटीवार यांचा पाठपुरावा; विलंबामागील कारणे रेल्वे प्रशासनाने केली स्पष्ट
- दुहेरीकरण प्रकल्पाला मंजुरी; पूर्ण झाल्यानंतर समयपालनात होणार मोठी सुधारणा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांच्या वारंवार होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय गांभीर्याने घेत रेल्वे प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा केला.
चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि गाड्यांचे समयपालन सुधारावे, या उद्देशाने आ. मुनगंटीवार यांनी रेल्वे प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) नागपूर विभागाचे मंडल रेल्वे व्यवस्थापक (DRM) दीपक कुमार गुप्ता यांनी गाड्यांच्या विलंबामागील कारणांबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
रेल्वे प्रशासनाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्राला उत्तरा दाखल दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्ग सध्या एकेरी (सिंगल) मार्ग असल्याने या मार्गावर प्रवासी गाड्यांसोबतच मालवाहतूक गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच रेल्वे सुरक्षेला प्राधान्य देत सुरू असलेली देखभाल, दुरुस्ती आणि विविध पायाभूत सुविधा विकासाची कामे यामुळे काही वेळा रेल्वे वाहतुकीवर परिणाम होतो. परिणामी, काही गाड्यांच्या वेळापत्रकात विलंब होत असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
उशिराने धावणाऱ्या प्रमुख गाड्यांमध्ये १२२५१/१२२५२ यशवंतपूर–कोरबा वेणगंगा एक्सप्रेस, ०७०५१/०७०५२ तिरुपती–रक्सौल एक्सप्रेस, ०७००५/०७००६ कार्ला पल्ली–रक्सौल एक्सप्रेस तसेच १२३८९/१२३९० गया–एमजीआर सुपरफास्ट एक्सप्रेसचा समावेश असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
गाड्यांचे वेळेवर संचालन सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने निरीक्षण व समन्वयाचे प्रयत्न सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच चंद्रपूर–गोंदिया रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढून गाड्यांच्या समयपालनात तसेच प्रवासी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चंद्रपूर परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्या असून, भविष्यात गाड्यांच्या विलंबात घट होऊन प्रवाशांना अधिक सुलभ आणि वेळेवर रेल्वे सेवा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
News - Chandrapur




Petrol Price




