महत्वाच्या बातम्या

 डॉ. विजय सिडाम यांचे वलनी येथे शेती बचाव अभियानत मार्गदर्शन : एल निनोच्या संकटात शाश्वत शेतीचा संदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : बदलत्या हवामानामुळे शेतीसमोर निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, जलसंधारण आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथील कृषी विस्तार शास्त्रज्ञ डॉ. विजय सिडाम यांनी केले.

चंद्रपूर तालुक्यातील वलनी येथे शेती बचाव अभियान अंतर्गत आयोजित विशेष शेतकरी मार्गदर्शन शिबिरात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके), सिंदेवाही आणि कृषि विभाग, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सारिका गोंड यांनी शासकीय कृषी योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला पोलीस पाटील अशोक मेश्राम, आशिष पांडे, कैलास कामडी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना डॉ. सिडाम यांनी एल निनोमुळे पावसाचे प्रमाण अनियमित होण्याची शक्यता व्यक्त करत शेतकऱ्यांनी हवामान अंदाजावर आधारित पीक नियोजन करावे, असे आवाहन केले. पाणी, माती आणि जैवविविधतेचे संवर्धन हेच शेती बचावाचे मुख्य आधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांनी मृदा परीक्षणानुसार संतुलित खत व्यवस्थापन करावे, सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा तसेच शेततळे, बंधारे आणि ठिबक सिंचनासारख्या जलसंधारण उपायांचा अवलंब करावा, असेही त्यांनी सांगितले. मुख्य पेरणीसाठी ७५ ते १०० मिमी पावसाची प्रतीक्षा करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कमी कालावधीची व दुष्काळ सहनशील पिके, आंतरपीक पद्धती, पीक फेरपालट, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन (IPM) तसेच पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शेतमालाचे मूल्यवर्धन करून थेट विक्री केल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले. संकटात घाबरून न जाता योग्य नियोजन, योग्य पीक निवड आणि पाणी बचत हीच शेतीच्या शाश्वत विकासाची गुरुकिल्ली आहे, असा संदेश डॉ. विजय सिडाम यांनी शेतकऱ्यांना दिला.

या अभियानाला वलनी परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी शेतीविषयक शंका विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील प्रमुख मंडळी व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Chandrapur




Related Photos