महत्वाच्या बातम्या

 रेल्वे दिवसाला खातेय ५० कोटी रुपयांची वीज : वार्षिक वीज बिल १८ हजार कोटी रुपयांवर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : देशाच्या विकासासाठी चोवीस तास धावणारी रेल्वे दररोज तब्बल 50 कोटी रुपयांची वीज खात असल्याचे समोर आले आहे. रेल्वेच्या एकूण रेल्वे मार्गांपैकी जवळपास 65 टक्क्यांहून अधिक मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे.

त्यामुळे रेल्वेकडून विजेवर धावणाऱया जास्तीत जास्त गाड्या चालवल्या जात असल्याने दररोज पाच कोटी युनिट वीज वापरले जात आहे. परिणामी डिझेलच्या वापरात मोठी घट झाली आहे.

रेल्वेकडून सध्या डिझेल आणि विजेवर गाडय़ा चालवल्या जात आहेत. मात्र डिझेलच्या किमती गगनाला भिडल्याने रेल्वेकडून जास्तीत जास्त गाडय़ा विजेवर चालवण्यासाठी भर दिला जात आहे. देशभरात रेल्वेचे सुमारे 68 हजार किलोमीटर लांबीचे रेल्वे मार्ग असून आतापर्यंत 44 हजार किलोमीटरहून अधिक लांबीच्या मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. त्यामुळे रेल्वे लांब पल्याच्या एक्सप्रेस गाडय़ा, लोकल ट्रेन आणि मालवाहतुकीच्या बहुतांशी गाडय़ा विजेवर चालवते, तर ज्या ठिकाणी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झालेले नाही त्याच मार्गावर डिझेल इंजिनच्या गाडय़ा चालवल्या जात आहेत. त्यामुळे रेल्वेकडून वार्षिक 18 हजार 410 दशलक्ष युनिट एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वीज वापरली जात आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या प्रतियुनिट विजेचा दर 9-10 रुपये असल्याने रेल्वेला वर्षाल 18 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचे बिल येत आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात उपनगरीय लोकल सेवेबरोबर सर्वच रेल्वे गाडय़ा विजेवर चालवल्या जात आहेत. त्यामुळे महिन्याला जवळपास 7 कोटी 10 लाख युनिट विजेचा वापर केला जात आहे. देशात रेल्वेचे 67 विभाग असून त्यात सर्वाधिक वीज वापर मुंबई विभागाकडून होत आहे.

रेल्वेकडून सुरुवातीला इंधन म्हणून सर्वाधिक कोळशाचा वापर केला जात होता. त्यात 1980च्या दशकापासून झपाटय़ाने घट होत गेली असून डिझेलच्या वापरात वाढ झाली आहे. सध्या रेल्वेकडून वर्षाला सुमारे 23 लाख 79 हजार लिटर डिझेलचा वापर झाला होता. मागील दहा वर्षांचा विचार करता डिझेलच्या वापरातही घट होताना दिसत आहे.





  Print






News - Rajy




Related Photos