नदी स्वच्छतेचा अँक्शन प्लॅन सादर करा
- जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे समितीला निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नद्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक विभागाने नदी स्वच्छतेसंबंधात त्यांचेकडे सोपविलेल्या जबाबदारीनुसार अँक्शन प्लॅन सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज दिले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला या अभियानाच्या सहाय्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी वीस कलमी सभागृहात घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता पी.एन.पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, जलसंधारण अधिकारी पवन देशट्टीवार, नदी प्रहरी सदस्य राहुल गुळघाणे व अजय काकडे प्रामुख्याने उपस्थित होते.
नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदी वाहणाऱ्या जास्तीत जास्त गावांमध्ये व्यापक जनजागृती कराण्यच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. पुढे ते म्हणाले, जिल्ह्यातील इरई व उमा या दोन नद्यांचा अभियानात समावेश करण्यात आला आहे.
याप्रसंगी जलसंधारण अधिकारी पवन देशट्टीवार व नदी प्रहरी सदस्य राहुल गुळघाणे यांनी अभियानाविषयी तसेच उमा नदीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. उमा नदीचा उगम चिमूर तालुक्यात होत असून ती चार तालुक्यातील 86 गावातून 130 किलोमिटर वाहत वैनगंगेला मिळते. उमा नदी व इरई नदी स्वच्छतेसाठी पर्यावरण क्षेत्रातील व्यक्ती, संस्था यांच्या सहकार्याने अभियान राबविण्यात येईल. नद्यामधील प्रदूषण दूर करणे, नदी किनाऱ्यावरील अतिक्रमण हटवणे, नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे, नागरिकांना जलसाक्षर करणे, पावसाचे पाणी अडवून भूजलस्तर उंचाण्याचे प्रयत्न करणे, नदीच्या प्रवाह जैवविविधतेबाबत माहिती देणे, तसेच अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषण अशा तीन प्रमुख घटकांचा परिणाम अभ्यासण्यावर अभियानात भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी पाटबंधारे विाभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी.काळे, मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रकाश गायकवाड, गटविकास अधिकारी उदय सुक्रे, वरिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ एच.एस.चौधरी, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे व संबंधीत अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
News - Chandrapur