महत्वाच्या बातम्या

 कृष्णार लग्नसोहळ्यात नक्षलवादी गाण्यावर नृत्य : पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील कृष्णार येथे एका लग्नसमारंभात नक्षलवादी कमांडर हिडमा माडवी यांच्या जीवनावर आधारित गाण्यावर नृत्य केल्याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडवली आहे.

लग्नसोहळ्यात नक्षली गाण्याचा ठेका -
माहितीनुसार, ६ मे रोजी रात्री कृष्णार येथे एका विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्यात डी.जे.वर पारंपरिक गाणी सुरू असताना बाबुराव कांदो यांनी उपस्थितांना चिथावणी देत प्रक्षोभक विधाने केली. त्यांनी म्हटले, पोलीस आदिवासी गावात कोणाच्या परवानगीने आले, नक्षलवादीच चांगले होते आणि आपला नेता हिडमा आहे, त्याचेच गाणे लावा, असे विधान करून वातावरण तणावपूर्ण केले.

यानंतर चैतू रुषी तेलामी यांनी हिडमा माडवी यांच्या जीवनावर आधारित गाणे डी.जे. ऑपरेटरकडे दिले. आर्यन हिचामी आणि शरद कांदो यांनी हे गाणे मोठ्या आवाजात वाजवले, ज्यावर सुमारे ४० ते ५० युवक-युवतींनी नृत्य केले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ ७ मे रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला.

पोलिसांची कारवाई -
व्हिडिओची सखोल तपासणी केल्यानंतर पोलिसांनी ठरवले की, या गाण्यातील मजकूर नक्षलवाद्यांचे समर्थन करणारा आणि शासनविरोधी भावना भडकवणारा आहे. पोलीस शिपाई रोशन पुराम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता आणि मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात या पाच जणांचा समावेश आहे.
१. शंकर हिचामी (डी.जे. मालक), २. बाबुराव कांदो, ३. चैतू रुषी तेलामी, ४. आर्यन हिचामी, ५. शरद कांदो

राज्यातील दुसरी घटना -
राज्यात नक्षल कमांडरच्या गाण्यावर गुन्हा दाखल होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी पुण्यातील एका शासकीय वसतिगृहातही असेच प्रकार घडला होता. पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, समाजातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कोणत्याही कृत्याची गय केली जाणार नाही.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos