जिल्ह्यात १५ हजारावर शेतकऱ्यांना सोयाबिन नुकसान भरपाई मंजुर

- विमाधारक शेतकऱ्यांना १२ कोटी १४ लाखाची भरपाई
- ६२ हजारावर शेतकऱ्यांनी केली होती विमा नोंदणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : पीक विमा योजनेंतर्गत गेल्या खरीप हंगामात कापूस, तुर, सोयाबिन व इतर पिकासाठी जिल्ह्यातील ६२ हजार ६६४ शेतकऱ्यांनी पिक विमा नोंदणी केली होती. या शेतकऱ्यांपैकी सोयाबिन पिकाचे नुकसान झालेल्या १५ हजार ३०५ शेतकऱ्यांना १२ कोटी १४ लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
योजनेंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरीता पीक पेरणीपासुन काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरित परिणाम करणाऱ्या इतर बाबीमुळे हंगामाच्या शेवटी, पीक कापणी प्रयोगाच्या आधारे तांत्रिक उत्पादन आधारे, सदर महसुल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरुन नुकसान भरपाई देण्यात येते. जर एखाद्या निर्धारित क्षेत्रातील विमा संरक्षित पिकाचे त्यावर्षीचे दर हेक्टरी सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आले तर त्या क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असे गृहीत घरण्यात येते.
जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस पिकाकरीता २९ हजार ७८२, तूर पिकाकरीता ८ हजार ५३३, सोयाबिन पिकाकरीता २४ हजार १८२ व इतर पिकांकरीता १६७ असे एकुण ६२ हजार ६६४ शेतकऱ्यांनी विमा नोंदणी केली होती. जिल्ह्यात एकुण ५५ महसूल मंडळापैकी ३७ महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे सोयाबिन पिकाचे नुकसान झाले होते. अशा नुकसानग्रस्त १५ हजार ३०५ शेतकऱ्यांना १२ कोटी १४ लाखाचा पिक विमा मंजूर करण्यात आला.
आर्वी तालुक्यातील ६ महसूल मंडळातील १४३७ शेतकरी, आष्टी तालुक्यातील १ महसूल मंडळ ३१० शेतकरी, देवळी तालुका ५ महसूल मंडळ ३५८५ शेतकरी, हिंगणघाट तालुका ७ महसूल मंडळ २९०८ शेतकरी, समुद्रपूर तालुका ७ महसूल मंडळ ३१२९ शेतकरी, सेलू तालुका ५ महसूल मंडळ २०४१ शेतकरी, वर्धा तालुक्यातील ६ महसूल मंडळातील १८९४ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
कारंजा व आष्टी तालुक्यातील प्रत्येकी २, वर्धा तालुक्यातील १ अशा ५ महसूल मंडळात सोयाबिन पिकाकरीता पिक विमा लागू झालेला नाही. उर्वरीत १३ महसूल मंडळाची नुकसान भरपाई परिगणना सुरु आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई सबंधीत अडचण असल्यास अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील भारतीय कृषि विमा कंपनीच्या कार्यालयाकडे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
विमा संरक्षित रक्कम व विमा नोंदणी -
गेल्या खरीप व रब्बी हंगामात विमा संरक्षित रक्कम कापूस ६० हजार, सोयाबिन ५७ हजार ५००, तूर ४४ हजार, उडित व मुंग २३ हजार, ज्वारी ३० हजार, गहू ४४ हजार, हरभरा ३६ हजार रुपये प्रति हेक्टरी संरक्षित रक्कम होती. कापूस पिकाकरीता २९ हजार ७८२, तूर पिक ८ हजार ५३३, सोयाबिन पिक २४ हजार १८२ व इतर पिकांकरीता १६७ अशा६२ हजार ६६४ शेतकऱ्यांची विमा नोंदणी झालेली होती. तसेच रब्बी हंगामात हरभरा पिकाकरीता ५ हजार ५१० तर गहू पिकाकरीता २ हजार६११ शेतकऱ्यांनी विमा नोंदणी केली होती.
News - Wardha




Petrol Price




