९७.२६ डेसिबलचा कर्णकर्कश आवाज : मूल पोलिसांची डीजेविरुद्ध सलग तिसरी कठोर कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करून कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्यांविरुद्ध मूल पोलिसांनी सलग तिसरी कठोर कारवाई केली. राजोली बसस्टँड चौक येथे झालेल्या या कारवाईत डीजे मालक, ऑपरेटर, वाहनचालक तसेच गणेश मंडळाच्या अध्यक्ष व सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी डीजे साहित्य आणि आयशर वाहन असा एकूण १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
२६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान राजोली बसस्टँड चौक, ता. मूल येथे डीजेच्या आवाजाची तपासणी करण्यात आली. यावेळी ध्वनीतीव्रता तब्बल ९७.२६ डेसिबल इतकी नोंदविण्यात आली. निर्धारित मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.
या प्रकरणी गणेश मंडळाचे अध्यक्ष अक्षय देवराव ठाकरे, सदस्य विकास हरीभाऊ हतवडे, तुषार दिलीप शेंडे, अतुल राजू मरके व अशोक नामदेवजी लकडे, डीजे मालक आकाश गणेश बाकडे, डीजे ऑपरेटर प्रतिम सुनील बाकडे तसेच वाहनचालक पंकज हदास मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान दोन कस्टम बेस, दोन कस्टम टॉप, तीन एम्प्लीफायर, एक प्लेयर बॉक्स, एक जनरेटर आणि एमएच ३४ एव्ही २४७१ क्रमांकाचे आयशर वाहन जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत १२ लाख ५० हजार रुपये आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९६१ मधील कलम ३८ व १३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई मुल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे, पोहवा नरेश कोडापे, नरेंद्र वाकडे, पोअं दिलीप पाध्ये, प्रकाश चीकराम, शंकर बोलसरे, मपोअं पुजा मेश्राम यांनी केले.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनीप्रदूषणास प्रतिबंध करणाऱ्या नियमांचे पालन करणे आवश्यक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मूल पोलिसांनी दिला आहे. ९७.२६ डेसिबलचा कर्णकर्कश आवाज; मूल पोलिसांची डीजेविरुद्ध सलग तिसरी कठोर कारवाई




Petrol Price




