धाकट्या भावाच्या हल्ल्यात थोरल्याचा मृत्यू : केशरवाहीत घरगुती वादाचा रक्तरंजित शेवट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : घरगुती वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये झालेल्या भांडणाला हिंसक वळण मिळाले. धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या डोक्यावर काठीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात आशिष भोयर २५ वर्षे रा. केशरवाही गंभीर जखमी झाले. नागपूर येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सावली तालुक्यातील केशरवाही येथे सोमवारी रात्री ही गंभीर घटना घडली.
आशिष भोयर आणि रुपेश भोयर हे सख्खे भाऊ असून, घरगुती तसेच किरकोळ कारणांवरून त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. यावेळी वाद विकोपाला गेल्यानंतर रुपेश याने मागून येत आशिष यांच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केला.
या हल्ल्यात आशिष गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. घटनेनंतर त्यांना तातडीने सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला असून, घटनेमागील कारणे आणि संपूर्ण परिस्थितीचा तपास केला जात आहे.




Petrol Price




