महत्वाच्या बातम्या

 पत्नीच्या चारित्र्यावर संशय : पतीला पाच वर्षांचा सक्त कारावास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस    
प्रतिनिधी / चंद्रपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर सत्तूरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा सक्त कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सुनावण्यात आला. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला रुग्णालयातील काम आटोपून घरी परत जात होती. दरम्यान, स्वागत मंगल कार्यालयाच्या मागील परिसरात आरोपी पतीने तिला घरी चलण्यास सांगितले. मात्र, तिने घरी जाण्यास नकार दिल्याने आरोपीने तिच्यावर सत्तूरने हल्ला केला. डोक्यावर, हातावर आणि पायावर दोन-तीन वेळा वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या घटनेनंतर महिलेच्या फिर्यादीवरून तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८/२०२३ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्परतेने आरोपीला अटक केली. तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल तसेच परिस्थितीजन्य पुरावे संकलित करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

या प्रकरणाची सुनावणी चंद्रपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. पी. एम. गुप्ता यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. सुधाकर डेगावार यांनी प्रभावी युक्तिवाद करत साक्षी-पुरावे न्यायालयासमोर सादर केले.

हे पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ अन्वये पाच वर्षांचा सक्त कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र प्रभाकर उपरे यांनी केला. न्यायालयीन पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार प्रकाश शेंदरे, ब्रह्मपुरी पोलिस ठाणे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे ॲड. सुधाकर डेगावार यांनी बाजू मांडली. ही कामगिरी पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली दोषसिद्धी कक्ष, चंद्रपूर यांच्या समन्वयातून पूर्ण करण्यात आली.





  Print






Related Photos