महत्वाच्या बातम्या

 बालकांना न्यूमोनियापासून संरक्षणासाठी वर्धा जिल्ह्यात विशेष मोहीम


- २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत ग्रामीण व शहरी भागात जनजागृती आणि गृहभेटी; पाच वर्षांखालील बालकांच्या आरोग्य तपासणीवर विशेष भर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : पाच वर्षांखालील बालकांना न्यूमोनियासारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळावे, तसेच आजाराचे वेळीच निदान होऊन योग्य उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी वर्धा जिल्ह्यात विशेष न्यूमोनिया प्रतिबंधक मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी आरोग्य यंत्रणेमार्फत २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत विविध आरोग्यविषयक उपक्रम, जनजागृती कार्यक्रम आणि गृहभेटी आयोजित करण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजसिंह पवार यांच्या तांत्रिक मार्गदर्शनात ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यावर्षी मोहिमेचे घोषवाक्य न्यूमोनिया नाही, तर बालपणही सही असे ठेवण्यात आले आहे.

न्यूमोनिया हा पाच वर्षांखालील बालकांमध्ये आढळणारा गंभीर श्वसनविकार आहे. वेळेत निदान आणि योग्य उपचार न मिळाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे बालकांना या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, लक्षणांची वेळीच ओळख आणि त्वरित उपचार या तीन बाबींवर मोहिमेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

स्तनपान आणि लसीकरणाबाबत पालकांना मार्गदर्शन -
बालकांच्या रोगप्रतिकारशक्तीच्या विकासासाठी जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच जन्मानंतर पहिले सहा महिने बालकाला केवळ आईचे दूध देणे आणि त्यानंतर योग्य पूरक आहार सुरू करून स्तनपान सुरू ठेवण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यासोबतच बालकांना आवश्यकतेनुसार व्हिटॅमिन ए चा पुरवठा आणि न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन (PCV) लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात येणार आहे. नियमित लसीकरण आणि योग्य पोषणामुळे बालकांना न्यूमोनियासह विविध संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते.

आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गृहभेटी -
या मोहिमेअंतर्गत आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका आणि संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत पाच वर्षांखालील बालकांच्या घरोघरी भेटी देण्यात येणार आहेत. या भेटीदरम्यान बालकांच्या आरोग्याची स्थिती, पोषण, लसीकरण आणि न्यूमोनियाची संभाव्य लक्षणे यांची माहिती घेतली जाणार आहे. तसेच पालकांना आजाराची लक्षणे ओळखणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर उपचार घेण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल.

कमी वजनाच्या व मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांवर विशेष लक्ष -
कमी वजनाने जन्मलेली तसेच मुदतपूर्व जन्मलेली बालके न्यूमोनियाच्या दृष्टीने अधिक जोखमीची असू शकतात. त्यामुळे अशा बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. याशिवाय विशेष नवजात शिशू काळजी कक्ष (SNCU), नवजात अतिदक्षता उपचार कक्ष (NICU) आणि नवजात शिशू स्थिरीकरण कक्ष (NBSU) यांसारख्या विशेष उपचार कक्षांतून उपचार घेऊन घरी परतलेल्या बालकांवरही विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.या बालकांच्या आरोग्याची नियमित पाहणी करून आवश्यकतेनुसार पुढील उपचार आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.

न्यूमोनियाची लक्षणे दिसताच त्वरित उपचार घ्या -
बालकांना खोकला येणे, जलद श्वासोच्छ्वास होणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा श्वास घेताना छातीचा खालचा भाग आत ओढला जाणे अशी लक्षणे आढळल्यास पालकांनी दुर्लक्ष करू नये. अशा परिस्थितीत बालकाला तातडीने जवळच्या आरोग्य संस्थेत घेऊन जावे. बालकाच्या प्रकृतीनुसार आवश्यक असल्यास पुढील उपचारांसाठी उच्चस्तरीय आरोग्य संस्थेत संदर्भित करण्यात येणार आहे.

बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी योग्य पोषण, स्तनपान, नियमित लसीकरण आणि स्वच्छतेच्या सवयींना प्राधान्य द्यावे. न्यूमोनियाची लक्षणे दिसल्यास स्वतःहून औषधोपचार न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

जिल्ह्यातील पाच वर्षांखालील प्रत्येक बालकापर्यंत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पोहोचविणे, पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि न्यूमोनियामुळे बालकांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम टाळणे हा या विशेष मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. या मोहिमेत नागरिकांनी आणि पालकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी केले आहे.





  Print






Related Photos