महत्वाच्या बातम्या

 रानटी हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ : ऐन कापणीच्या तोंडावर धान पीक उद्ध्वस्त


- किटाळी, चुरमुरा, सूर्यडोंगरीसह सहा गावांतील शेतकरी भयभीत; कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : आरमोरी तालुक्यातील किटाळी, चुरमुरा, सूर्यडोंगरी, आकापूर, ईजेवारी व पेठ परिसरात रानटी हत्तींच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, ऐन कापणीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या उभ्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. २१ सप्टेंबरच्या रात्री हत्तींच्या कळपाने शेतशिवारात प्रवेश करून तोंडाशी आलेले धान पीक पायाखाली तुडवत उद्ध्वस्त केले. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात रानटी हत्तींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रात्रीच्या वेळी हत्तींचे कळप अचानक शेतांमध्ये घुसत असून, उभ्या धान पिकाची नासधूस करीत आहेत. हत्तींच्या हालचालींमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना रात्रीच्या वेळी जागता पहारा द्यावा लागत आहे.

यंदा शेतीचे उत्पादन चांगले होईल आणि कापणीनंतर आर्थिक परिस्थितीला हातभार लागेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, कापणी काही दिवसांवर आलेली असतानाच हत्तींच्या कळपाने शेतात घुसून उभे पीक तुडविल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. वर्षभर मेहनत करून जोपासलेले पीक डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

जीव मुठीत घेऊन शेतशिवारात पहारा -
हत्तींच्या वाढत्या वावरामुळे शेतात जाणेही शेतकऱ्यांसाठी धोकादायक बनले आहे. रानटी हत्तींचा कळप कधी आणि कुठल्या दिशेने शेतात दाखल होईल, याची शाश्वती नसल्याने शेतकरी एकट्याने शेतशिवारात जाणे टाळत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने अनेक शेतकरी समूहाने शेतात जात असून, रात्रीच्या वेळी पिकांच्या संरक्षणासाठी पहारा देत आहेत.

हत्तींच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसोबतच स्वतःच्या जीवित सुरक्षेचीही चिंता सतावत आहे. ऐन कापणीच्या काळात अशा प्रकारे हत्तींचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वन विभागाच्या कार्यपद्धतीवर शेतकऱ्यांचा सवाल -
रानटी हत्तींचा वाढता उपद्रव रोखण्यात वन विभाग अपयशी ठरत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. हत्तींचा वावर वाढल्यानंतरही प्रभावी उपाययोजना होत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हत्तींकडून नुकसान झाल्यानंतर केवळ पंचनामे करून किंवा तुटपुंजी भरपाई देऊन प्रश्न सुटणार नाही. वारंवार होणारे नुकसान थांबविण्यासाठी वन विभागाने हत्तींच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासोबतच शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

भरपाईपेक्षा कायमस्वरूपी तोडगा हवा -
रानटी हत्तींकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे नुकसानभरपाईच्या तात्पुरत्या उपायापेक्षा हत्तींचा शेतशिवारातील वावर रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

किटाळी, चुरमुरा, सूर्यडोंगरी, आकापूर, ईजेवारी आणि पेठ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सध्या हत्तींच्या दहशतीमुळे चिंतेचे वातावरण आहे. वन विभागाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच भविष्यात अशा प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.





  Print






Related Photos