महत्वाच्या बातम्या

 महाकॅम्पा निधीतून व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाची कामे पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


- महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरणाची (महा कॅम्पा) बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंथा / मुंबई : वनसंवर्धन राखीव क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांच्या जीवनात आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी कॅम्पा अंतर्गत असलेल्या निधीचा मोठा हातभार लागू शकतो.  या निधीच्या उपयोगातून व्याघ्र प्रकल्प आणि इतर संरक्षित क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाची कामे पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

तसेच या निधीतून पूर्ण केलेल्या वनीकरण, मृद व जलसंधारणाच्या कामांची उपग्रह व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पडताळणी करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आज दिल्या. सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरणाची (महा कॅम्पा)  बैठक झाली.  यावेळी आढावा घेताना मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे वनमंत्री गणेश नाईक उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कॅम्पाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची सध्याची पडताळणीची पद्धत बदलून कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्यात यावी.  पूर्ण झालेल्या वनीकरणाच्या कामांपैकी काही नमुने निवडून त्यांचे सर्वेक्षण करावे. संबंधित यंत्रणांनी मृद व जलसंधारण तसेच वनीकरण कामांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही कामे पूर्ण करावीत.

राष्ट्रीय कॅम्पा निधीतून राज्यातील राखीव वनक्षेत्रातील गावांचे टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यासाठी  केंद्राकडे निधीची मागणी करावी. त्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा.  राज्यस्तरीय कॅम्पा प्राधिकरणाला मनुष्यबळ उपलब्धतेसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात यावी. राज्याच्या राखीव निधीसाठी रिझर्व बँकेमध्ये खाते उघडण्याची कार्यवाही पूर्ण करावी. या निधीवरील अधिकच्या व्याजासाठी चांगले गुंतवणूक पर्याय निवडून  प्रयत्न करावे.  राज्याच्या  महत्वाकांक्षी ३०० कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी या निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वनीकरण करावे आणि वनेतर जमीन वनांखाली आणावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सध्या असलेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये या निधीचा उपयोग करीत कुरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा. यामधून चाऱ्याची उपलब्धता आणखी सुनिश्चित करता येईल.

बैठकीस वन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, अपर मुख्य सचिव (वित्त) विकासचंद्र रस्तोगी, पर्यावरण सचिव जयश्री भोज, कृषी सचिव परिमल सिंग, ग्रामविकास सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी आणि कॅम्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी याटबोन उपस्थित होते.

कॅम्पा अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा थोडक्यात आढावा -
पर्यायी वनीकरण अंतर्गत आतापर्यंत १ लाख ७ हजार ८६५ हेक्टरवर रोपवनाची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच २०१९-२०२०  ते २०२५-२०२६ या कालावधीत ५६२ निवासस्थाने आणि ८३ कार्यालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.  त्याचप्रमाणे महिलांकरिता ६२ विश्रामगृहे तयार करण्यात आली.  कुरण विकास कार्यक्रमांतर्गत १५, ७२४  हेक्टर क्षेत्रावर कुरण विकासाची कामे पूर्ण करण्यात आली . या निधीच्या उपयोगातून  व्याघ्र प्रकल्प, इतर संरक्षित क्षेत्रांमधील ५५ गावांचे पुनर्वसन करण्यात आले.





  Print






Related Photos