महत्वाच्या बातम्या

 पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र शेतकरी मतदारसंघ निर्माण करा


- आजाद समाज पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात ठराव; आरोग्य-शिक्षण प्रश्नांसाठी हेल्पलाईनची घोषणा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र शेतकरी मतदारसंघ निर्माण करून नोंदणीकृत शेतकरी आयडीधारकांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणी आजाद समाज पक्षाच्या गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्ता संमेलनात करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना विधिमंडळात अधिक संघटित प्रतिनिधित्व मिळावे, या उद्देशाने यासंदर्भातील ठराव संमेलनात मंजूर करण्यात आला.

आजाद समाज पक्ष, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने कात्रटवार सभागृह, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आगामी काळातील पक्षाची संघटनात्मक बांधणी, ग्रामपातळीवरील जनतेच्या प्रश्नांवर लढा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश सचिव दिगंबर पलटणकर होते. महाराष्ट्र प्रदेश युवा महासचिव संदीपदादा मोरे व विदर्भ सचिव धर्मानंद मेश्राम यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व जिल्हा प्रभारी विनोद मडावी, तर विशेष अतिथी म्हणून ॲड. कैलास जाधव, देवा साळवे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत सातार, चेतन काटेंगे, जिल्हा महासचिव अंकुश कोकोडे, जिल्हा संघटक हंसराज उराडे आणि जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विवेक खोब्रागडे होते.

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी -
भारत कृषिप्रधान देश असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अपेक्षित गांभीर्याने व प्रभावीपणे मांडले जात नसल्याचा मुद्दा संमेलनात मांडण्यात आला. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, उत्पादन खर्च, शेतीमालाला मिळणारा बाजारभाव, सिंचन, पीकविमा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान अशा विविध प्रश्नांवर विधिमंडळात अधिक संघटित प्रतिनिधित्व असावे, अशी भूमिका मांडण्यात आली.

याच पार्श्वभूमीवर पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर स्वतंत्र शेतकरी मतदारसंघ निर्माण करण्याचा ठराव संमेलनात मंजूर करण्यात आला. नोंदणीकृत शेतकरी आयडीधारकांना मतदानाचा अधिकार देऊन शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारा आमदार निवडण्याची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सदर ठराव आजाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आजाद यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्णयही घेण्यात आला.

गावागावात प्रतिसरपंच; पहिल्या टप्प्यात ३५ नियुक्त्या -
ग्रामपातळीवरील नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणे, ग्रामविकासातील अनियमितता तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जनतेचा सजग प्रतिनिधी म्हणून प्रतिसरपंच उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी सांगितले.

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ३५ ग्रामपंचायतींसाठी प्रतिसरपंचांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये वाकडी येथील विजय देवतळे, मार्कंडा येथील रत्ना सरपे, येडानूर येथील नितेश पोटावी, विहीरगाव येथील मुकेश सहारे, मालेवाडा येथील संतोष मोहुर्ले आणि बांधगाव येथील भास्कर वट्टी यांच्यासह विविध गावांतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

आरोग्य व शिक्षणासाठी स्वतंत्र हेल्पलाईन -
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील समस्यांसाठी मदत मिळावी, यासाठी आजाद समाज पक्षाच्या वतीने स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. हेल्पलाईन क्रमांक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शासकीय रुग्णालयातील समस्या, उपचारातील अडचणी, आरोग्यसेवेतील त्रुटी, शाळा व शिक्षकांशी संबंधित प्रश्न, विद्यार्थ्यांच्या अडचणी तसेच शिक्षण विभागाशी संबंधित तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी या हेल्पलाईनचा उपयोग केला जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हा व तालुका पातळीवर नवीन नियुक्त्या -
पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देण्यासाठी विविध पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही संमेलनात करण्यात आल्या. यामध्ये सतीश कुसराम यांची जिल्हा कार्याध्यक्ष, तर तुषार रामटेके यांची जिल्हा प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली.

तसेच मारोती येलावार - चामोर्शी तालुकाध्यक्ष, सुरेश पवार - चामोर्शी तालुका उपाध्यक्ष, आकाश दुर्गे - चामोर्शी तालुका सचिव, पितांबर हर्रो - कुरखेडा तालुका उपाध्यक्ष, नितेश गृरुनुले - मालेवाडा क्षेत्र प्रमुख, रंजित बांबोळे - धानोरा तालुका कार्याध्यक्ष आणि उमेश तिम्मा - एटापल्ली तालुकाध्यक्ष यांच्यासह विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी -
आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले. प्रत्येक गावात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.

आगामी निवडणुकांमध्ये तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारीमध्ये प्राधान्य देण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी पक्षाची आगामी कार्यपद्धती, संघटन विस्तार आणि जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलनात्मक भूमिका घेण्याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

शासकीय सेवेत निवड झालेल्या सहकाऱ्यांचा सत्कार -
दरम्यान, आजाद समाज पक्षाचे सहकारी प्रितेश अंबादे, नयना बन्सोड आणि शुभम पाटील यांची शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षा सोनाशी डांगे यांची आरोग्य विभागात शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा शिल्ड देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, गडचिरोली विधानसभा प्रमुख धनराज दामले, धानोरा तालुकाध्यक्ष किशोर उसेंडी, गडचिरोली तालुकाध्यक्ष प्रेम मडावी, कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिकराम, भामरागड तालुकाध्यक्ष महेंद्र उसेंडी, महिला आघाडीच्या तारका भडके, शोभा खोब्रागडे, वनिता उसेंडी, तसेच सतीश दुर्गमवार, नितेश वेस्कडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या संमेलनाच्या माध्यमातून शेतकरी, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामपातळीवरील नागरिकांच्या प्रश्नांवर संघटनात्मक पातळीवर काम करण्याची दिशा निश्चित करण्यात आली.





  Print






Related Photos