महत्वाच्या बातम्या

 पंडित दीनदयाल वार्डात आढळला दुर्मिळ भारतीय सरडा : कारवा सफारी झोनमध्ये सुखरूप मुक्तता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील पंडित दीनदयाल वार्ड परिसरात सोमवार ५ ऑक्टोबर रोजी दुर्मिळ भारतीय सरडा (Chamaeleo zeylanicus) आढळून आल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले. नागरिकांनी सरड्याला पकडून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आलम यांच्याकडे सोपविले. डॉ. आलम यांनी याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. घोरुडे यांना माहिती दिल्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

क्षेत्र सहायक रामसोच यादव, वनरक्षक अनिल चौधरी, वनमजूर नितेश बावणे व ओमकार पोहणे यांनी सरड्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. सरड्याला कोणतीही इजा होणार नाही, याची दक्षता घेत त्याला पुढील कार्यवाहीसाठी सुरक्षितपणे हलविण्यात आले.

सहाय्यक उपवनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. घोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरड्याला कारवा-बल्लारशाह सफारी झोनमध्ये नेण्यात आले. तेथे त्याच्या नैसर्गिक अधिवासाला अनुकूल ठिकाणाची पाहणी करून सरड्याला जंगलात सुखरूप मुक्त करण्यात आले. यावेळी कारवा-बल्लारशाह सफारी झोनमधील सफारी मार्गदर्शकांना या दुर्मिळ भारतीय सरड्याची ओळख, त्याचा नैसर्गिक अधिवास तसेच जैवविविधतेतील महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली.

भारतीय सरडा हा वन्यजीव परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक असून, मानवी वस्तीत अशा प्रकारचे वन्यजीव आढळल्यास नागरिकांनी घाबरून त्यांना इजा करू नये किंवा स्वतःहून पकडण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी वन विभाग अथवा प्रशिक्षित वन्यजीव बचाव पथकाला माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले.





  Print






Related Photos