महत्वाच्या बातम्या

 अपघातातील जखमींसाठी आरमोरीतील तरुणांचा एक हात मदतीचा ठरतोय जीवनदायी


- व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे तातडीने मदत : गोल्डन अवरमध्ये उपचार मिळवून देण्याचा अनोखा उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : रस्ते अपघातानंतर गंभीर जखमींना वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने अनेकदा परिस्थिती हाताबाहेर जाते. अपघातग्रस्त व्यक्ती रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेली असतानाही मदतीसाठी पुढे येण्यास नागरिक घाबरतात. कायदेशीर अडचणी निर्माण होतील किंवा पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, या भीतीमुळे अनेकजण अपघातग्रस्तांकडे दुर्लक्ष करतात. परिणामी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो आणि त्याचा त्यांच्या जीवावर गंभीर परिणाम होऊ शकतो. हीच समस्या लक्षात घेऊन आरमोरीतील सामाजिक कार्यकर्ते नंदू नाकतोडे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला ‘एक हात मदतीचा’ हा व्हॉट्सॲप ग्रुप आता अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी ठरत आहे

अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, जखमींना कमीत कमी वेळेत रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू व्हावेत आणि शक्य तितके प्राण वाचविता यावेत, या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आरमोरी शहरासह परिसरातील संवेदनशील युवक, सामाजिक कार्यकर्ते, रुग्णवाहिका चालक, डॉक्टर आणि मदतीसाठी तत्पर असलेल्या नागरिकांना या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आणण्यात आले आहे.

एका संदेशावर मदतीसाठी धाव -

आरमोरी व परिसरात कुठेही अपघात झाल्यास घटनेची माहिती, अपघाताचे छायाचित्र आणि घटनास्थळाचे लोकेशन ग्रुपवर तात्काळ शेअर केले जाते. संदेश मिळताच घटनास्थळाच्या जवळ असलेले सदस्य वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतात. जखमींची परिस्थिती पाहून त्यांना आवश्यक ती प्राथमिक मदत केली जाते आणि रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जातात. अपघातग्रस्त व्यक्तीची ओळख पटल्यास त्याची माहिती अवघ्या काही मिनिटांत नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्याचे कामही ग्रुपच्या सदस्यांकडून केले जाते. त्याचबरोबर जवळच्या शासकीय किंवा खासगी रुग्णालयाशी संपर्क साधून जखमींवर तातडीने उपचार सुरू होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाते.

रक्ताची गरज भासल्यासही तत्काळ मदत -

अपघातातील गंभीर जखमींना उपचारादरम्यान रक्ताची आवश्यकता भासल्यास एक हात मदतीचा ग्रुपमधील सदस्य रक्तदात्यांचा शोध घेऊन त्यांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतात. त्यामुळे रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध करून देण्यास मदत होते. या उपक्रमामुळे अपघाताच्या ठिकाणी जखमी अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी लागणारा वेळ कमी होत आहे. विशेषतः अपघातानंतरचा गोल्डन अवर महत्त्वाचा मानला जात असल्याने या कालावधीत उपचार मिळवून देण्यावर उपक्रमातील सदस्यांचा भर असतो.

आरमोरीपुरता मर्यादित न राहता परिसरात विस्तार -

एक हात मदतीचा हा उपक्रम आता केवळ आरमोरी शहरापुरता मर्यादित न राहता आरमोरी, गडचिरोली, ब्रह्मपुरी, वडसा तसेच परिसरातील ग्रामीण भागातील संवेदनशील युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात अपघात किंवा गंभीर वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाल्यास जवळच्या सदस्यांमार्फत तातडीने मदत उपलब्ध करून देणे शक्य होत आहे.

सोशल मीडियाचा समाजहितासाठी आदर्श वापर -

सध्या सोशल मीडियाचा वापर विविध कारणांसाठी केला जात असला तरी त्याच तंत्रज्ञानाचा समाजहितासाठी प्रभावीपणे उपयोग कसा करता येतो, याचे उदाहरण आरमोरीतील तरुणांनी या उपक्रमातून दाखवून दिले आहे. एका व्हॉट्सॲप संदेशाच्या माध्यमातून घटनास्थळाची माहिती काही क्षणांत अनेकांपर्यंत पोहोचते आणि त्यातून प्रत्यक्ष मदतीसाठी कार्यकर्ते पुढे येतात. या उपक्रमामुळे आतापर्यंत अनेक गंभीर जखमींना वेळेत उपचार मिळण्यास मदत झाली असून, त्यातील अनेकजण उपचारानंतर सुखरूप घरी परतल्याचे उपक्रमातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कोणताही आर्थिक स्वार्थ न ठेवता केवळ माणुसकीच्या भावनेतून सुरू असलेल्या या उपक्रमाचे आरमोरीसह संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.

गोल्डन अवरमध्ये मदत मिळवून देणे हेच ध्येय -

आरमोरी, गडचिरोली, ब्रह्मपुरी आणि वडसा या शहरांसह परिसरातील ग्रामीण भागातील संवेदनशील युवक व सामाजिक कार्यकर्त्यांना या उपक्रमात एकत्र आणण्यात आले आहे. परिसरात कुठेही भीषण अपघात झाल्यास अथवा गंभीर रुग्णाला तातडीने रक्ताची गरज भासल्यास पीडित व्यक्तीला क्षणाचाही विलंब न होता मदत मिळावी, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. गोल्डन अवरमध्ये योग्य उपचार आणि वेळेवर रक्त उपलब्ध करून देऊन एखाद्या गरजूचे प्राण वाचवणे, या भावनेतूनच हा सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असे एक हात मदतीचाचे संकल्पना प्रमुख नंदू नाकतोडे यांनी सांगितले.

मदतीसाठी नागरिकांनी अपघातस्थळी गर्दी करण्याऐवजी तातडीने रुग्णवाहिका व संबंधित यंत्रणेला माहिती देऊन जखमींना सुरक्षितपणे वैद्यकीय मदत मिळवून देण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.





  Print






Related Photos