आखूड दोर, उपासमार अन् वेदना : देवपायली जंगलात ११ गोवंश पोलिसांच्या ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : देवपायली जंगल परिसरात गोवंश जातीच्या पाळीव जनावरांना आखूड दोराने बांधून, अन्न-पाणी व निवाऱ्याची पुरेशी व्यवस्था न करता उपासमारीच्या स्थितीत ठेवल्याचा गंभीर प्रकार नागभीड पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान उघडकीस आला. पोलिसांनी कारवाई करून अंदाजे ६५ हजार रुपये किमतीची ११ गोवंश जनावरे ताब्यात घेतली असून त्यांच्या देखभालीसाठी गोशाळेत दाखल केले आहे.
नागभीड पोलीस ठाण्याचे पथक १५ सप्टेंबर रोजी मिंडाळा बिट परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी देवपायली जंगल परिसरात गोवंश जनावरांना निर्दयीपणे बांधून ठेवल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
यावेळी जंगल परिसरात ११ गोवंश आढळून आली. ही जनावरे आखूड दोराने बांधलेली होती. तसेच त्यांच्यासाठी पुरेसे अन्न, पाणी, निवारा आणि चारापाण्याची व्यवस्था नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
ताब्यात घेतलेल्या ११ गोवंश जनावरांना योग्य देखभाल व चारापाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी भारतीय गोरक्षण व गोशाळा, तळोधी (बा.) (गोविंदपूर), ता. नागभीड येथे दाखल करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी देवपायली गावात चौकशी केली असता अक्षय दिलीप बदन व चक्रधर नानाजी नवघडे यांनी सदर गोवंश जनावरे संतोष सदाशिव ठाकरे (५८), रा. पारडी जं., ता. नागभीड यांनी जंगलात बांधून ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार संतोष सदाशिव ठाकरे याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(f), (h), (i) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास नागभिड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार करीत आहे




Petrol Price




