खड्डा जीवघेणा ठरण्यापूर्वी गोंडपिपरी पोलिसांनी घेतली धाव


- राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक खड्डा पोलिस अमलदारांनी बुजविला; गोंडपिंपरी पोलिसांच्या संवेदनशीलतेचे कौतुक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर-अहेरी राष्ट्रीय महामार्गावर रासबिहारी कॉटन जिनिंगजवळ पडलेला धोकादायक खड्डा वाहनचालकांसाठी अपघाताला निमंत्रण ठरत होता. विशेषतः रात्रीच्या वेळी हा खड्डा सहज लक्षात येत नसल्याने गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गोंडपिंपरी पोलिसांनी प्रशासनाच्या हालचालीची प्रतीक्षा न करता थेट घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस अमलदार अतुल तोडासे आणि मुनेश्वर रात्रे यांनी पुढाकार घेत खड्डा बुजविला. रस्त्याची दुरुस्ती करणे हे संबंधित यंत्रणेचे काम असले, तरी नागरिकांच्या जीविताला असलेला तातडीचा धोका दूर करण्यासाठी पोलिसांनी स्वतःहून केलेली ही कृती विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील या खड्ड्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. रात्रीच्या वेळी भरधाव वाहने खड्ड्यात आदळण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत खड्डा बुजविला. त्यांच्या या प्रयत्नामुळे मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्यास मदत झाली आहे.
कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी -
पोलिसांचे काम केवळ गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि कायद्याची अंमलबजावणी करणे एवढ्यापुरते मर्यादित नसून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या वेळी तत्परतेने पुढे येणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गोंडपिंपरी पोलिस अमलदारांनी आपल्या कृतीतून याचा प्रत्यय दिला.
अपघात घडल्यानंतर मदत करण्यापेक्षा अपघाताची शक्यता असलेला धोका आधीच दूर करणे महत्त्वाचे, या भावनेतून पोलिसांनी घेतलेला पुढाकार नागरिकांसाठी दिलासादायक ठरला आहे. गोंडपिंपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कामाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.




Petrol Price




