लोकसंवाद कार्यक्रमातून बालहक्क व बालकांच्या सुरक्षेबाबत जनजागृती


- माहिती व जनसंपर्क विभागाचा लोकसंवाद कार्यक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : बालकांची सुरक्षितता, त्यांचे मूलभूत हक्क आणिसोशल मीडियाच्या अतिवापरामुळे उद्भवणारे दुष्परिणाम यांसारख्या गंभीर व महत्त्वाच्या विषयांवर समाजमन जागृत करण्यासाठी पुलगाव येथील स्थानिक गणेश मंडळात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालकांचे हक्क, संरक्षण व त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
गणेशोत्सवात नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी माहितीव जनसंपर्क विभागामार्फत लोकसंवाद अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पुलगाव येथील चंद्रशेखर आझाद गणेश मंडळ येथे लोकसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय चाईल्ड हेल्पलाइन १०९८ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी चाईल्ड हेल्पलाईनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक, जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप बोंडसे, चंद्रशेखर आझाद गणेश मंडळाचे अध्यक्ष राहुल कोटनाके, नगरसेवक अमरदीप देशमुख, अभिजित पटपकार, आकाश राऊत, प्रदिप बावने, कुणाल काळे, संतोष देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी आशिष मोडक यांनी बालकांच्या सुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
प्रवासादरम्यान बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न, रेल्वे पटरीवर होणारे अपघात, कमी वयात नैराश्यातून उद्भवणाऱ्या आत्महत्येच्या घटना तसेच घरून पळून येणाऱ्या बालकांची सुरक्षा यावर चिंता व्यक्त करत त्यावरील दक्षतात्मक उपाययोजना सांगितल्या.
याशिवाय बाल लैंगिक शोषण प्रतिबंध, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक, बालविवाह रोखणे, हरवलेल्या बालकांचा शोध, नशामुक्त अभियान, अनाथ बालकांचे पुनर्वसन आणि शासकीय बालसंगोपन योजना याविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी १०९८ चाईल्ड हेल्पलाइन आणि ११२ आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा या टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन मोडक यांनी केले. कमी वयात बालकांना वाहने चालवण्यास दिल्याने होणारे गंभीर अपघात, त्यातून उद्भवणारे कायदेशीर प्रश्न, चोरीचे वाढते प्रमाण, मानव तस्करी आणि हरवलेल्या बालकांच्या समस्यांबाबत पालकांनी अधिक सतर्क व जागरूक राहण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला देऊन बालविवाह, बाल लैंगिक शोषण आणि हरवलेल्या मुलांच्या प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता चाईल्ड हेल्प लाईनचे सूरज वानखेडे, साप्ताहिक देवळी दर्शनचे संपादक चंद्रकांत पवार, साप्ताहिक शिव प्रेरणाचे संपादक पंकज तिवारी, साप्ताहिक विदर्भाचा आवाज विदर्भ माझाचे संपादक हर्षल काळे, युवा मित्र परिवार रुग्ण सेवक श्रीकांत कुमरे व गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.




Petrol Price




