महत्वाच्या बातम्या

 दिल्ली येथील नॉर्थ-ईस्ट स्टुडन्ट फेस्टिवलमध्ये सहभागी युवक-युवती व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते गौरव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील युवक-युवती तसेच आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने प्रोजेक्ट उडान अंतर्गत दिल्ली येथे ०४ व ०५ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित ९ व्या नॉर्थ-ईस्ट स्टुडन्ट फेस्टिवलमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ०४ आत्मसमर्पित माओवादी सदस्य तसेच अनुप डान्स ग्रुपमधील १४ युवक-युवती असे एकूण १८ युवक-युवती सहभागी झाले होते.

सदर महोत्सवामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या रेला नृत्याचे पारंपरिक वाद्यांसह मनमोहक सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणातून गडचिरोली जिल्ह्राची समृद्ध आदिवासी संस्कृती, पारंपरिक कला व लोकपरंपरा राष्ट्रीय पातळीवरील मंचावर प्रभावीपणे सादर करण्यात आली. तसेच शांतता, एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला.

राष्ट्रीय स्तरावरील या महोत्सवात सहभागी होऊन गडचिरोलीच्या संस्कृतीचे प्रभावी सादरीकरण केल्यानंतर आत्मसमर्पित माओवादी सदस्य व युवक-युवतींचा आज ०८ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली एम. रमेश यांच्या हस्ते गौरव करण्यात येऊन सहभागी सदस्यांना रोख बक्षिस देखील देण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक यांनी सहभागी सर्व आत्मसमर्पित सदस्य व युवक-युवतींचे अभिनंदन करताना सांगितले की, माओवादविरोधातील चार दशकांच्या संघर्षानंतर गडचिरोली जिल्हाने माओवादापासून मुक्त होत देशपातळीवर आपली नवी ओळख निर्माण केली आहे.

याच पाश्र्वभूमीवर प्रथमच नॉर्थ-ईस्ट स्टुडंट फेस्टिव्हल दिल्ली येथे गडचिरोलीच्या समृद्ध आदिवासी संस्कृतीचे आणि पारंपरिक नृत्यकलेचे प्रतिनिधित्व करण्याची  महत्त्वपूर्ण संधी मिळाली. देशातील विविध राज्यातील मान्यवर मंत्री व उपस्थितांच्या साक्षीने आपण सादर केलेले नृत्य गडचिरोलीच्या परिवर्तनाची, शांततेची आणि नव्या आशेची प्रभावी ओळख होती. आपल्या उत्कृष्ट सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकून गडचिरोलीसह महाराष्ट्र राज्याचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे. यासोबतच आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना अतिदुर्गम गडचिरोली येथून देशाची राजधानी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर आदिवासी पारंपरीक रेला नृत्य सादर करण्याची संधी मिळाल्याबाबत गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले आहे.





  Print






Related Photos