महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यात २०० हेक्टरवर ज्वारी पीक प्रात्यक्षिके : बियाण्यांवर १०० टक्के अनुदान 


- रब्बी हंगामातील ज्वारी लागवडीला प्रोत्साहन; एक हजार बियाणे मिनिकिटांचे होणार वितरण, महिला शेतकऱ्यांना प्राधान्य

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : रब्बी हंगामात ज्वारी लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत सन २०२६-२०२७ मध्ये बियाणे अनुदान आणि पीक प्रात्यक्षिक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०० हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पीक प्रात्यक्षिके घेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच, प्रत्येकी चार किलो वजनाची एक हजार ज्वारी बियाणे मिनिकिटे १०० टक्के अनुदानावर वितरित केली जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी, शेतकरी गट आणि संबंधित संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती म. हिरळकर यांनी केले आहे.

ज्वारीची उत्पादकता वाढविणे, शेतकऱ्यांना बियाणे बदलासाठी प्रोत्साहित करणे तसेच सुधारित व संकरित वाणांचा प्रसार करणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. दर्जेदार बियाण्यांचा वापर वाढवून ज्वारी पिकाचे उत्पादन सुधारण्यास मदत व्हावी, यासाठी कृषी विभागाकडून विविध घटकांद्वारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

पीक प्रात्यक्षिकांसाठी एकरी तीन हजार रुपयांचे अनुदान -
योजनेतील पीक प्रात्यक्षिक घटकांतर्गत प्रति एकर तीन हजार रुपये याप्रमाणे १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. हा घटक नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त एक हेक्टर क्षेत्रासाठीच लाभ घेता येणार आहे. पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सुधारित व संकरित ज्वारी वाणांचा प्रसार करणे, बियाणे बदलास चालना देणे आणि शेतकऱ्यांना सुधारित पीक व्यवस्थापनाची माहिती उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. यामुळे ज्वारी लागवडीचे क्षेत्र आणि उत्पादकता वाढविण्यास हातभार लागणार आहे.

दोनशे क्विंटल प्रमाणित बियाणे वितरणाचे उद्दिष्ट -
प्रमाणित ज्वारी बियाणे वितरणासाठी दहा वर्षांच्या आतील वाणांचे १०० क्विंटल आणि दहा वर्षांवरील वाणांचे १०० क्विंटल, असे एकूण २०० क्विंटल बियाणे वितरित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. दहा वर्षांच्या आतील वाणांसाठी बियाण्याच्या किमतीच्या ५० टक्के किंवा प्रति क्विंटल तीन हजार रुपये, यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून दिली जाणार आहे. तर दहा वर्षांवरील वाणांसाठी बियाण्याच्या किमतीच्या ५० टक्के किंवा प्रति क्विंटल एक हजार ५०० रुपये, यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.

याशिवाय, प्रत्येकी चार किलो वजनाची एक हजार ज्वारी बियाणे मिनिकिटे १०० टक्के अनुदानावर वितरित केली जाणार आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना ज्वारी लागवडीसाठी बियाणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य -
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी आणि फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. एका कुटुंबातील पती, पत्नी आणि अविवाहित प्रौढ अपत्य यांपैकी केवळ एका व्यक्तीलाच योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थ्यांची निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी पात्रतेच्या अटी पूर्ण करून आवश्यक माहिती आणि कागदपत्रांसह अर्ज करणे आवश्यक आहे. सन २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असल्याने योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे पात्र महिला शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतकरी गटांची नोंदणी आवश्यक -
पीक प्रात्यक्षिक घटकासाठी अर्ज करणारा शेतकरी गट ३१ मार्च २०२६ पूर्वी शासनमान्य यंत्रणेकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ही अट पूर्ण करणाऱ्या पात्र शेतकरी गटांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना आणि सहकारी संस्थांना योजनेच्या संबंधित तरतुदींनुसार लाभ घेता येणार आहे.

महाडीबीटी पोर्टलवर करा अर्ज -
ज्वारी बियाणे अनुदान आणि पीक प्रात्यक्षिक योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. योजनेची पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि अनुदानाच्या अटींबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती म. हिरळकर यांनी कळविले आहे. रब्बी हंगामातील ज्वारी लागवडीला चालना देणे, सुधारित वाणांचा वापर वाढविणे आणि शेतकऱ्यांची उत्पादकता सुधारण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी योजनेच्या अटींची माहिती घेऊन वेळेत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.





  Print






Related Photos