अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी प्रसिद्ध : भंडारा जिल्ह्यातील १,३७४ शेतकरी पात्र


- पात्र शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील १ हजार ३७४ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची तिसरी यादी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक विलास देशपांडे यांनी केले आहे
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना घोषित केली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर एकूण ३० हजार ५९४ कर्जखात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या यादीत २२ हजार ३३६, तर दुसऱ्या यादीत २ हजार ५९१ पात्र शेतकऱ्यांचा समावेश होता. आता तिसऱ्या यादीत आणखी १ हजार ३७४ पात्र लाभार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
पात्र शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित ग्रामपंचायती, विविध कार्यकारी सहकारी संस्थांची कार्यालये आणि संबंधित बँकांच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या नावाची खात्री करून योजनेच्या पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक कार्यवाही करावी.
आधार प्रमाणिकरणासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक -
योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणासाठी त्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात येणार आहे. यादीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. आधार प्रमाणिकरण करण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्याची ॲग्रीस्टॅक (Agristack) पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे.
भंडारा जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे प्रमाणिकरण केवळ केवायसी प्रक्रिया पूर्ण करून बायोमेट्रिक पद्धतीने करण्यात येणार असून, ओटीपीद्वारे प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध नाही.
प्रमाणिकरणानंतर कर्जखात्यात लाभाची रक्कम जमा -
पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाल्यानंतरच योजनेअंतर्गत मंजूर लाभाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने संबंधित लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता आवश्यक नोंदणी व आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.




Petrol Price




