महत्वाच्या बातम्या

 साफसफाईच्या बहाण्याने दीड तोळ्याचे मंगळसूत्र लंपास : दोन भामट्यांकडून महिलेची ₹१.५० लाखांची फसवणूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : तांब्याची व चांदीची भांडी विशेष द्रवाने साफ करून देण्याचे आमिष दाखवत दोन अज्ञात भामट्यांनी एका महिलेची दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास करून सुमारे १ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना बल्लारपूर शहरातील बामणी परिसरातील टिचर कॉलनी येथे घडली. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, संगीता संतोष भुते (३५) या टिचर कॉलनी, मडावी ले-आऊट, बामणी येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. मंगळवारी २६ मे रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास दोन अनोळखी इसम त्यांच्या घरासमोर आले. त्यांनी तांब्याच्या वस्तू विशेष लिक्विडने स्वच्छ करून देतो, असे सांगितले.   त्यानुसार महिलेने घरातील तांब्याचा गडवा साफ करण्यासाठी दिला. आरोपींनी तो स्वच्छ करून दाखविल्याने महिलेचा त्यांच्यावर विश्वास बसला.

त्यानंतर आरोपींनी चांदीच्या वस्तू आणि सोन्याचे दागिनेही त्याच द्रवाने स्वच्छ करून देण्याचे आमिष दाखविले. महिलेने देवघरातील चांदीची मूर्ती साफ करण्यासाठी दिली असता तीही स्वच्छ करून देण्यात आली. विश्वास वाढल्यानंतर महिलेने गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र साफ करण्यासाठी आरोपींकडे दिले.

आरोपींनी घरातील एक लहान डबा मागवून त्यात द्रव टाकल्याचे भासविले आणि मंगळसूत्र त्यात ठेवले असल्याचे सांगून डब्याचे झाकण बंद करून महिलेच्या ताब्यात दिले. दहा मिनिटांनंतर डबा उघडा, मंगळसूत्र अधिक चमकेल, असे सांगून दोघेही इसम तेथून निघून गेले.

काही वेळानंतर महिलेने डबा उघडून पाहिला असता त्यामध्ये मंगळसूत्र नसल्याचे आढळले. आरोपी परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. चोरीस गेलेले मंगळसूत्र सुमारे दीड तोळे वजनाचे असून त्याची किंमत अंदाजे १ लाख ५० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फसवणूक करणारे दोन्ही आरोपी अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयोगटातील, मध्यम बांध्याचे, सावळ्या वर्णाचे व सुमारे साडेपाच फूट उंचीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. ते मराठी भाषेत बोलत असल्याने स्थानिक असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos