गडचिरोलीच्या जनतेच्या जीवाशी खेळ थांबवा; विकासाच्या घोषणा नव्हे, सुरक्षित रस्ते द्या : संतोष ताटीकोंडावार यांचा शासनाला इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष वास्तव यामधील तफावत अधोरेखित करत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी शासनावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. हिवाळी अधिवेशनात गडचिरोलीच्या विकासावर मोठमोठी भाषणे होत असताना जिल्ह्यातील नागरिकांना आजही सुरक्षित रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे की, एकेकाळी मुंबईत बसलेल्या सत्ताधाऱ्यांना गडचिरोली कुठे आहे, हेही माहीत नव्हते. आज जिल्ह्याचा विकास, स्टील हब आणि औद्योगिक प्रकल्पांच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात नागरिकांना सुरक्षित रस्त्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे. विकासाच्या नावाखाली मोठमोठी आश्वासने दिली जात असताना जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ताटीकोंडावार यांनी विशेषतः NH-३५३C आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाकडे लक्ष वेधले. तब्बल सहा वर्षांपासून या महामार्गाचे काम अपूर्ण असून सुमारे १०० किलोमीटरच्या या मार्गावरील शेकडो गावांतील हजारो नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होत असून मोठे खड्डे, चिखल आणि खराब रस्त्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. एखादा निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडल्यावरच शासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
गडचिरोलीचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री असतानाही जिल्ह्यातील रस्त्यांची अशी दयनीय अवस्था असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या अपयशाचे नव्हे, तर लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचेही प्रतीक असल्याची टीका त्यांनी केली. नागरिकांनी वारंवार निवेदने दिली, आंदोलने केली आणि प्रश्न उपस्थित केले, तरीही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
गेल्या अनेक वर्षांपासून आपण लोकशाही मार्गाने आंदोलने, उपोषणे, निवेदने आणि विविध जनआंदोलनांच्या माध्यमातून नागरिकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असल्याचे ताटीकोंडावार यांनी सांगितले. मात्र त्यानंतरही शासन आणि प्रशासन जागे होत नसल्यास हा लोकशाही व्यवस्थेचा पराभव असून जनतेच्या संयमाची परीक्षा घेतली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी शासनाकडे तीन प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामध्ये NH-३५३C आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करणे, पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना करणे तसेच कामातील विलंब आणि निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकारी व संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करणे या मागण्यांचा समावेश आहे.
गडचिरोलीच्या जनतेचा संयम आता संपत चालला असून केवळ विकासाच्या घोषणा करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष काम करून दाखवावे, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा जनतेचा उद्रेक आणि तीव्र लोकशाही आंदोलन अटळ असून त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींवर राहील, असा इशाराही संतोष ताटीकोंडावार यांनी दिला.
News - Gadchiroli




Petrol Price




