किराणा दुकानाच्या आड सुरू होता हुक्का तंबाखूचा काळाबाजार : एलसीबी ची कारवाई, दोघे जेरबंद


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात अवैध तंबाखू व हुक्का साहित्य विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने बाबुपेठ परिसरात मोठी कारवाई करत प्रतिबंधित हुक्का शिषा तंबाखूचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे ५७ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी १९ मे रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजताच्या सुमारास मराठा चौक, बाबुपेठ येथील एका किराणा दुकानावर छापा टाकला.
छाप्यामध्ये किराणा व्यवसायाच्या आडून हुक्का पार्लरमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित सुगंधी हुक्का शिषा तंबाखूचा साठा बेकायदेशीरपणे ठेवून विक्री करण्यात येत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून EAGLE कंपनीचे २०० ग्रॅम वजनाचे २० पॅकेट्स तसेच Hola कंपनीचे २०० ग्रॅम वजनाचे १८५ पॅकेट्स जप्त केले. या साठ्याची किंमत सुमारे ५७ हजार ३२५ रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी हनुमान श्रीकृष्ण आंबटकर (३८) आणि संजय श्रीकृष्ण आंबटकर (३५), दोघेही रा. मराठा चौक, बाबुपेठ, चंद्रपूर यांच्याविरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपींना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतीश अवधरे, रजनिकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, पो अं हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




