लग्नातील फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे शेतातील उभा ऊस जळून खाक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / औरंगाबाद : औरंगाबादच्या वाळूज भागातील लिंबेजळगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभा ऊस जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे बाजूलाच सुरु असलेल्या एका लग्न समारंभात करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे ही आग लागली असल्याचं समोर आले आहे. ज्यात एकूण पाच शेतकऱ्यांचा अंदाजे सहा लाखांचा ऊस जळून खाक झाला आहे. अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने अखेर आग विझवण्यात यश आले. तर या आगीची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लिंबेजळगाव शिवारातील गट क्रमांक ३३ मधील शेतकरी चंद्रशेखर त्रिंबक आलोने, सुरेश त्रिंबक आलोने, अवंतिका त्रिंबक आलोने, दत्तात्रय हरि आलोने व गट क्रमांक १७ मधील सुलेमान मोहम्मद खान या शेतकऱ्यांचा जवळपास दहा एकर क्षेत्रात ऊस लावलेला होता. यातील अधिकांश ऊस तुटून कारखान्याला गेला होता. तर काही ऊस बेणे म्हणून लावण्यासाठी तसाच उभा होता. दरम्यान रविवारी या ऊसाला अचानक आग लागली. ऊसाला आग लागल्याची माहिती मिळाल्याने शेत मालकासह परिसरातील शेतकयांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच वाळूज पोलिसांना माहिती देऊन अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या दोन बंबच्या मदतीने अखेर आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झाले होते. शेताजवळच असलेल्या गुरु सृष्टी लाँन नावाचे मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यालयात रविवारी दुपारी लग्नाचा कार्यक्रम होता. वरात लग्न मंडपात येताच फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. यातील काही फटाके उडून ऊसात पडले आणि ही आग लागली असा आरोप शेतकरी चंद्रशेखर आलो यांनी केला आहे. तर आगीची माहिती मिळताच तलाठी विजय गिरबोणे यांनी या आगीचा पंचनामा केला. ज्यात पूर्ण वाढलेला उभा ऊस व ठिबकचे पाईप असे अंदाजे ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. उसाला आग लागल्याची माहिती मिळताच औरंगाबाद महानगर पालिका व वाळूज एमआयडीसी अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. तोपर्यंत बराचसा ऊस जळून खाक झाला होता. तर या घटनेची नोंद वाळूज पोलिसात करण्यात आली आहे.
News - Rajy