गरीब कर्तबगार महिलांचा सन्मान करण्याचा मोदी सरकारचा उपक्रम कौतुकास्पद : जिल्हा प्रभारी योगीता पिपरे
- अथक परिश्रमाने कुटुंबाचे पालन पोषण व मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या होतकरू महिलांचा सन्मान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शहरी व ग्रामीण भागात अनेक निराधार व विधवा महिला विविध कामे व रोजगार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र त्यांचा कुठेही सन्मान होत नाही किंवा गरीब, दुर्बल घटक म्हणून त्यांना हीनतेची वागणूक दिल्या जाते. ही बाब हेरून देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब मजूर दुर्बल महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला व देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज जी यांचे सन्मानचिन्ह देण्याचा उपक्रम सुरू केला हा केंद्र सरकारचा उपक्रम निश्चितच गरीब दुर्बल महिलांना नवी ऊर्जा व बळ देणारा आहे.
केंद्रातील मोदी शासनाने महिलांसाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. याचा लाभ घेऊन सर्व सामान्य महिलांनी मुला-मुलींना उच्च शिक्षण देऊन उच्च पदस्थ अधिकारी बनवावे व त्यांना समाजाची सेवा करण्यास प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन भाजपा महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले. भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने जिल्हा प्रभारी योगीता पिपरे यांच्या पुढाकाराने स्व. सुषमा स्वराज यांचे सन्मानचिन्ह देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. तसेच संपूर्ण जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित करून कर्तृत्ववान व होतकरू महिलांना स्व. सुषमा स्वराज यांचे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रामनगर, गडचिरोली येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकात महिला मेळावा व स्वकर्तुत्वाने व परिश्रम घेऊन कुटुंबाचे पालन पोषण व मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या कर्तबगार व होतकरू महिलांचा सत्कार कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदेश सदस्य बाबुराव कोहळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, माजी जिप सभापती रंजिता कोडाप, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, वछला मुनघाटे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता उरकुडे, मांडवगडे, छाया श्रीपदवार, शहर महामंत्री रश्मी बाणमारे, शहर उपाध्यक्ष विवेक बैस, युवा नेते संजय मांडवगडे प्रामुख्याने उपस्थित होते.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गडचिरोली शहरातील कर्तबगार व होतकरू अशा २४ स्त्रीशक्तींचा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने जिल्हा प्रभारी योगीता पिपरे यांच्या पुढाकारातून माजी परराष्ट्र मंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या नावाने सन्मानचिन्ह देऊन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
News - Gadchiroli