जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीवर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात येणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीवर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात येणार असून यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या सचिवांच्या अधिसूचनेनुसार या समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील गोशाळा पांजरापोळ संस्थांपैकी एका संस्थेचा अध्यक्ष, प्राणी कल्याण विषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती आणि जिल्ह्यातील मानव हितकारक कार्य करणारे, प्राण्यांवर प्रेम करणारे किंवा प्राणी कल्याणासाठी काम करणा-या पाच सहा कार्यकर्त्यांची नेमणूक करावयाची आहे. नेमणुकीसाठी इच्छुक असलेल्या आणि संबंधित कार्यात किमान तीन वर्षांचा अनुभव असलेल्या सर्व पशुप्रेमींनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नागपूर कार्यालयाकडे आवेदन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करताना त्यामध्ये स्वतःचे प्राणी विषयक केलेले काम आणि आवश्यक कागदपत्र जोडणे गरजेचे राहील तसेच स्वतःचे आधार कार्ड आणि माहिती ही खरी असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सुद्धा अर्जदाराला सादर करावे लागेल. अर्ज जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, बॅाटनिकल गार्डनसमोर, सेमिनरी हिल्स या कार्यालयामध्ये 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत स्वीकारले जातील. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची सर्व अर्जदारांनी नोंद घेण्याचे कळविण्यात आले आहे.
News - Nagpur