.. म्हणून पत्रकार दानिश सिद्दीकीची हत्या झाली : तालिबानने दिले स्पष्टीकरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
रॉयटर्ससाठी अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करत असलेले भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी हे त्यांच्या मृत्यूसाठी स्वत: जबाबदार आहेत, रिपोर्टिंग करताना त्यांनी आमच्याशी कोणताही समन्वय साधला नाही असे तालिबानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात १६ जुलैला अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करत असलेले भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांची तालिबान्यांकडून हत्या करण्यात आली होती.
तालिबानच्या राजनितिक कार्यालयाचा प्रवक्ता असलेल्या सोहेल शाहिने याने भारतीय माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, "तालिबानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला आणि त्यामुळे झालेल्या दानिश सिद्दीकी यांच्या हत्येला ते स्वत: जबाबदार आहेत. रिपोर्टिंग करताना त्यांनी तालिबानशी कोणताही समन्वय ठेवला नव्हता. आम्ही अनेकवेळा पत्रकारांना आवाहन केले आहे की ते आमच्या ठिकाणी येतात तेव्हा त्यांनी आमच्यासोबत समन्वय साधला पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यांना सुरक्षा प्रदान करु शकतो." 
अफगाणिस्तानमध्ये रॉयटर्स या वृत्तवाहिनीसाठी रिपोर्टिंग करणाऱ्या भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांची तालिबान या दहशतवादी गटाकडून हत्या करण्यात आली आहे. दानिश सिद्दीकी अफगाणिस्थानमधील परिस्थिती कव्हर करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्या ठिकाणी होते. अफगाणिस्थानातील स्थानिक वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, दानिश सिद्दीकी यांची हत्या कांधार प्रांतातील स्पिन बोल्डक परिसरात करण्यात आली. 
मूळच्या दिल्लीच्या असणाऱ्या दानिश सिद्दिकी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक टीव्ही रिपोर्टर म्हणून केली होती. त्यानंतर ते फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करु लागले. दानिश सिद्दीकी यांना २०१८ मध्ये त्यांचे सहकारी अदनान आबिदी यांच्यासह पुलित्जर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी ते पुलित्जर पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय होते. दानिश यांनी रोहिंग्या शरणार्थी प्रकरणही कव्हर केले होते.   Print


News - World | Posted : 2021-08-14
Related Photos