महत्वाच्या बातम्या

 सावलीत बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातून कन्या शिक्षण व सुरक्षेवर मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : पंचायत समिती सावली येथे जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, चंद्रपूर यांच्या अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सखी वन स्टॉप सेंटर आणि चाइल्ड हेल्पलाइनच्या माध्यमातून बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. २२ सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात किशोरवयीन मुलींचा मानसिक विकास, शिक्षणातील समान संधी, सुरक्षितता आणि सर्वांगीण प्रगती या विषयांवर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मीनाक्षी भस्मे, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार, सहाय्यक गटविकास अधिकारी परिहार, बाल विकास प्रकल्प अधिकारी अलंकार मरसकोल्हे, तालुका अभियान व्यवस्थापक विवेक नागरे, सावली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक तिजारे, प्रशांत बंडेवार, संरक्षण अधिकारी बिंबिसार भसारकर यांची उपस्थिती होती.

मार्गदर्शक म्हणून चाइल्ड हेल्पलाइनच्या सुपरवायझर कल्पना फुलझेले आणि सखी वन स्टॉप सेंटरच्या पॅरामेडिकल स्टाफ मनिषा देठे यांनी विविध विषयांवर माहिती दिली. मुलींना शिक्षणाच्या समान संधी मिळणे, लिंगभेदाला आळा घालणे, किशोरवयीन मुलींचा मानसिक विकास आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महत्त्व यावेळी स्पष्ट करण्यात आले.

बाल संरक्षण यंत्रणेची रचना, प्रमुख कायदे, शासनाच्या विविध योजना तसेच बालकांच्या शिक्षण व सुरक्षिततेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. चाइल्ड हेल्पलाइन १०९८ ही ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी कार्यरत असलेली यंत्रणा, सखी वन स्टॉप सेंटरच्या सुविधा, महिला हेल्पलाइन १८१, महिला सक्षमीकरण, बाल संगोपन योजना, बालमजुरी प्रतिबंध, बालविवाह प्रतिबंध, दत्तक प्रक्रिया आणि अनाथ प्रमाणपत्र याबाबतही माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाला सावली तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन अंगणवाडी सेविका अर्चना इंदोरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कल्पना फुलझेले यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी बेटी बचाओ, बेटी पढाओ तसेच बालविवाह प्रतिबंधाची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.






  Print






Related Photos