गुंतवणूक परिषेदेतून जिल्ह्यात रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल : उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत


- जिल्हा गुंतवणूक परिषदेत ३ हजार ११ कोटींचे सामंजस्य करार
- उद्योगात स्थानिकांना प्राधान्य द्या
- तरुणांच्या उद्योगांना शासनाचे भक्कम पाठबळ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वर्ध्यातील उद्योगांची क्षमता आणि स्थानिक उद्योजकांचा उत्साह कौतुकास्पद असून, जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही उद्योगमंत्र्यांनी दिली. जिल्हा गुंतवणूक परिषदेत तब्बल ३ हजार ११ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, या गुंतवणुकीतून जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केला.
आज जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने आर्शिवाद सेलीब्रेशन हॉल येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी शोभिता पाठक, एमआयडीसी संघटनेचे अध्यक्ष प्रविण हिवरे, नागपूर विभागाचे उद्योग व सेवा सहआयुक्त शिवकुमार मुद्दमवार, लघु उद्योग भारतीचे महामंत्री हरीष हांडे, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग व सेवा सहाय्यक आयुक्त सुनील हजारे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील उद्योग, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. विशेषतः प्लास्टिकला पर्याय म्हणून काचेच्या बाटल्यांमध्ये उत्पादनांचे पॅकेजिंग करण्याचा वर्ध्यातील प्रयोग राज्यासाठी आदर्श आहे. वर्ध्यातील उद्योजकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने उत्पादनांची निर्मिती आणि पॅकेजिंग करून नवा आदर्श निर्माण केला आहे. वर्ध्याचे हे मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात, तसेच रत्नागिरीसारख्या जिल्ह्यांमध्येही राबविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले.
वर्ध्यातील हळदीची गुणवत्ता लक्षात घेता जिल्ह्यात हळद संशोधन केंद्र तसेच त्याचे सब-सेंटर सुरू करण्यासाठी हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून तरुणांना उद्योग उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत केली जात आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी एक कोटी रुपये, तर सर्व्हिस क्षेत्रासाठी ५० लाख रुपयांपर्यंतची मदत उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. वर्ध्यातील तरुणांनी अवघ्या ५० लाख रुपयांच्या निधीतून फायर डोअरची निर्मिती सुरू केली आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे उद्योगमंत्र्यांनी नमूद केले.
एक जिल्हा, एक उत्पादन योजनेंतर्गत तयार होणाऱ्या स्थानिक उत्पादनांना देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सर्व विमानतळांवर स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मराठी उद्योजकांनी तयार केलेल्या पैठणीसह विविध ओडीओपी उत्पादनांच्या विक्रीसाठी नवी दिल्लीत १५ कोटी रुपये खर्चून ॲम्पोरियम उभारण्यात येत असल्याचे डॉ. सामंत यांनी सांगितले.
उद्योजकांनी सामाजिक दायित्व निधीचा अधिकाधिक उपयोग समाजोपयोगी कामांसाठी करावा, असे आवाहनही उद्योगमंत्र्यांनी केले. वाढदिवसाच्या कार्यक्रमांवर किंवा केवळ औपचारिक उपक्रमांवर निधी खर्च करण्याऐवजी शाळांच्या सुविधा सुधारण्यासाठी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या विकासासाठी निधी वापरावा, असे त्यांनी सांगितले. वर्ध्याच्या भूमीतून सुरू झालेला गुंतवणुकीचा हा प्रवास आता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्यात येईल. गुंतवणुकीसाठी करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची १०० टक्के अंमलबजावणी करण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार असून, त्यातून जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केला.
वर्ध्यात अधिकाधिक उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर -
वर्धा जिल्ह्यात गुंतवणूक वाढवून स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या गुंतवणूक परिषदेमुळे वर्ध्यातील उद्योगांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मागील काही वर्षांत राज्यात अनेक उद्योग आणि गुंतवणुकीचे प्रकल्प आले आहेत.
समृद्धी महामार्ग सुरू झाल्यामुळे वर्धा, नागपूर आणि अमरावतीसह विदर्भातील जिल्ह्यांची नाशिक, ठाणे, मुंबई आणि पुणे या प्रमुख औद्योगिक केंद्रांशी कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढलेल्या दळणवळणाचा फायदा स्थानिक उद्योजक, शेतकरी आणि उद्योगांना करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे, असे डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले.
स्थानिक उद्योजकांना शासनाची साथ आणि आवश्यक सहकार्य मिळाल्यास वर्धा जिल्ह्यातील उद्योगांना मोठी चालना मिळू शकते. जिल्ह्यातील उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देऊन नवीन उद्योग उभारण्यास प्रोत्साहन दिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. त्यामुळे वर्धा जिल्ह्याला औद्योगिक विकासाच्या नकाशावर अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील ५३ उद्योग समुहाशी ३ हजार ११ कोटी २० लक्ष रुपयाचा सामजस्य करार करण्यात आला. यामध्ये सर्वाधिक इवोनिथ १ हजार कोटी ७२५ लक्ष रुपये, एसएमडब्लयु इस्पात प्रा.लि. ५०० कोटी, श्रीनिवास स्पीनटेक्स १५० कोटी रुपये, आश्वी पॉलीपॅक ७५ कोटी रुपये, विश्वत्रिवेणी टेक्सटाईल्स ५० कोटी रुपये यांच्यासह ५३ करार करण्यात आले. या गुंवतणूक करारातून जिल्ह्यातील हजारो स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते करारपत्राचे हस्तांतरण करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील उद्योजकांना जास्तीत जास्त कर्ज मंजूर केलेल्या बँकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवकुमार मुद्दमवार यांनी केले तर संचालन व आभार ज्योती भगत यांनी केले. गुंतवणूक परिषेदेला जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर उद्योजक उपस्थित होते.




Petrol Price




