राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त गडचिरोलीत भव्य सॉफ्टबॉल स्पर्धा


- नवबौद्ध मुलांच्या शाळेचा संघ विजेता; गोंडवाना सैनिकी विद्यालयाला उपविजेतेपद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथे भव्य सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. क्रीडा व युवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या मान्यतेने सॉफ्टबॉल व बेसबॉल मार्गदर्शन केंद्राच्या वतीने गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत विविध शाळा व क्रीडा संघांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडाकौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, सॉफ्टबॉल व बेसबॉल जिल्हा संघटनेचे सचिव प्रा. ऋषिकांत पापडकर, प्रा. रूपाली पापडकर, योगेश चव्हाण, नवबौद्ध मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक आंबीलकर सर तसेच रमण गागापूरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
चार संघांचा उत्स्फूर्त सहभाग -
या स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालय, चामोर्शी सॉफ्टबॉल संघ, शिवाजी हायस्कूल गडचिरोली आणि नवबौद्ध मुलांची शाळा या चार संघांनी सहभाग नोंदविला. सहभागी खेळाडूंनी सामन्यांमध्ये उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची दाद मिळविली. सामन्यांमध्ये खेळाडूंमध्ये विजयासाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. आक्रमक खेळासोबतच बचावाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत खेळाडूंनी आपले कौशल्य सिद्ध केले. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण होण्याबरोबरच संघभावना, शिस्त आणि स्पर्धात्मक वृत्तीला चालना मिळाली.
नवबौद्ध मुलांची शाळा ठरली विजेती -
स्पर्धेत दमदार कामगिरी करत नवबौद्ध मुलांच्या शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळविले. तर गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोलीच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवत उपविजेतेपद पटकावले.
विजेत्या आणि उपविजेत्या संघांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी नियमित सराव, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात पुढे जावे तसेच जिल्ह्याचे नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
सॉफ्टबॉलला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न -
गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांची ओळख करून देणे आणि त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव देणे या उद्देशाने अशा स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरत आहे. सॉफ्टबॉल व बेसबॉलसारख्या खेळांना जिल्ह्यात प्रोत्साहन मिळाल्यास ग्रामीण व दुर्गम भागातील गुणवंत खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळू शकते. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त झालेल्या या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरणात खेळण्याचा अनुभव मिळाला. अशा उपक्रमांमुळे शालेय स्तरावरूनच गुणवंत खेळाडू शोधून त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यास मदत होणार आहे.
प्रशिक्षकांचे परिश्रम -
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सॉफ्टबॉल व बेसबॉल प्रशिक्षक आशिष निजाम, शेषराज खेडेकर, प्रसाद ताजणे, प्रवीण पोयाम आणि स्वप्निल म. यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेच्या आयोजनासाठी शिक्षक, प्रशिक्षक, आयोजक तसेच सहभागी संघांच्या मार्गदर्शकांनी सहकार्य केले. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित या स्पर्धेने गडचिरोली जिल्ह्यातील क्रीडा वातावरणाला चालना मिळाली असून, विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी पुढे यावे, असा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला.




Petrol Price




