महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीच्या दुर्गम भागातील दळणवळणाला बळ : धानोऱ्यात १४.१३ कोटींच्या तीन पुलांची उभारणी


- पावसाळ्यात संपर्क तुटण्याची वर्षानुवर्षांची समस्या सुटणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे धानोरा तालुक्यातील दुर्गम भागांना जोडणाऱ्या तीन पुलांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. नाबार्ड-३१ योजनेंतर्गत या तीनही पुलांसाठी एकूण १४.१३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मंजूर झालेल्या कामांमध्ये मौजा सावंगा ते मांगेवाडा रस्त्यावरील पुलासाठी ५.९९ कोटी रुपये, पयडी ते आलकनार रस्त्यावरील पुलासाठी ६.६४ कोटी रुपये आणि आलकनार ते कनेली रस्त्यावरील पुलासाठी १.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पावसाळ्यात नदी-नाल्यांना पूर आल्यास या भागातील अनेक गावांचा मुख्य प्रवाहाशी संपर्क तुटत असे. परिणामी नागरिकांना जीव धोक्यात घालून नदी-नाले पार करावे लागत होते, तर विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांची आरोग्यसेवा आणि शेतकऱ्यांची दैनंदिन कामे विस्कळीत होत होती. या पुलांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर परिसरात बारमाही दळणवळणाची सोय उपलब्ध होऊन नागरिकांची अनेक वर्षांची अडचण दूर होणार आहे. दुर्गम व आदिवासीबहुल भागातील मूलभूत सुविधांना प्राधान्य देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीच्या विकासाला गती मिळत असून, प्रत्येक दुर्गम गावापर्यंत विकासाचा लाभ पोहोचविण्याचा निर्धार कायम राहील, असे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी यावेळी सांगितले.

या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, विजय कुमरे, जिल्हा महामंत्री डॉ. प्रकाश गेडाम, तालुका महामंत्री सुभाष धाईत, पवन येरमे, श्रीनिवास दुल्लमवार, नगरसेवक गटनेते संजय कुंडू, नगरसेवक मल्लिक बुधवानी, कालिदास लेंगगुरे, संतोष एक्का, अभिजित गाईन, कलिराम राऊत, अविनाश पोरेटी, प्रशांत राऊत, प्रशांत पेदापड्डीवार, गाव पाटील रमेश वालको, गाव पाटील दानचू तोफा आणि उपसरपंच शेपुजी उसेंडी यांची उपस्थिती होती.





  Print






Related Photos