पैशांचे आमिष दाखवून बँक खात्यांचा ताबा : खात्यांचा सायबर फसवणुकीसाठी गैरवापर, चंद्रपुरात गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : पैशांची आर्थिक अडचण असल्याचा फायदा घेत एका तरुणाला पैशांचे आमिष दाखवून त्याच्या नावाने बँक खाती उघडून घेतल्याचा आणि त्या खात्यांचा गैरवापर केल्याचा प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. बँक पासबुक, एटीएम कार्ड आणि सिमकार्ड स्वतःकडे ठेवून खात्यांमधून संशयास्पद आर्थिक व्यवहार करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
या प्रकरणी योगेश मिरानी (रा. चंद्रपूर) याच्याविरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर गरीबदास भावे (२४), रा. चांदापूर, ता. मूल, ह.मु. फुकटनगर, चंद्रपूर असे फसवणूक झाल्याचे सांगणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
किशोर हा पडोली येथील शर्मा चौक परिसरातील नेक्सा शोरूमजवळ असलेल्या डिलिव्हरी आउटलेटमध्ये मागील दीड वर्षापासून काम करतो. त्याच्यासोबत पूर्वी काम करणाऱ्या लखन भोयर याने पैशांची गरज असल्यास ओळखीच्या व्यक्तीला बँक खाते वापरण्यास दिल्यास चांगले पैसे मिळतील, असे सांगितले. त्यानंतर लखनने किशोरची योगेश मिरानी याच्याशी गांधी चौकात भेट घडवून दिली.
योगेशने किशोरला त्याच्या नावाने बँक खाते उघडून वापरण्यास देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपये देण्याचे आमिष दाखविले. मार्च २०२६ मध्ये दोघांनी मूल येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जाऊन किशोरच्या नावाने खाते उघडले. खाते उघडल्यानंतर मिळालेले पासबुक, एटीएम कार्ड आणि नवीन सिमकार्ड योगेशने स्वतःकडे घेतले. त्याबदल्यात किशोरला केवळ साडेतीन हजार रुपये देण्यात आले.
काही महिन्यांनंतर बँकेकडून किशोरला फोन करून त्याच्या खात्यात एक लाख ते पंधरा लाख रुपयांपर्यंत संशयास्पद व्यवहार झाल्याची माहिती देण्यात आली. बँकेत चौकशी केली असता खात्यात फसवणुकीचे व्यवहार होत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर किशोरने खाते आणि एटीएम बंद करण्यास सांगितले.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात पैशांची गरज असल्याने किशोर पुन्हा योगेशच्या संपर्कात आला. योगेशने त्याला यश मोबाईल शॉपमध्ये नेऊन त्याच्या कागदपत्रांच्या आधारे एअरटेल पेमेंट बँकेत खाते उघडले. त्याचे एटीएम कार्ड, पासबुक आणि सिमकार्ड स्वतःकडे ठेवून घेतले. दोन दिवसांनी पैसे देण्याचे आश्वासन दिले; मात्र पैसे न मिळाल्याने किशोरने वारंवार विचारणा केली. प्रत्येक वेळी योगेशकडून टाळाटाळ करण्यात आली.
काही दिवसांनी आपल्या नावाने काढलेल्या एअरटेल पेमेंट बँकेच्या खात्याचाही गैरवापर होत असल्याची माहिती किशोरला मिळाली. त्याने कागदपत्रे व कार्ड परत मागितले असता, खाते दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यास दिल्याचे योगेशने सांगितले. यापूर्वी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खात्यातही संशयास्पद व्यवहार झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे किशोरच्या लक्षात आले. योगेशने इतर लोकांनाही पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या नावाने खाती उघडून घेतल्याचा आरोपही किशोरने केला आहे.
या प्रकरणी किशोर भावे याच्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे करीत आहेत.




Petrol Price




