मानोरा येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेचे प्रशिक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मानोरा व कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मानोरा येथे दोन दिवसीय सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणाचे उद्घाटन गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांच्या हस्ते झाले. यावेळी नागपूर विभागाचे नोडल अधिकारी डॉ. विजय डोईफोडे आणि जिल्हा नोडल अधिकारी डॉ. लक्षदीप पारेकर यांनी प्रशिक्षणस्थळी भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
प्रशिक्षणादरम्यान डॉ. प्रिती राजगोपाल, डॉ. गजानन राऊत, डॉ. मिना मडावी, डॉ. संदीप भटकर, डॉ. भावेश वानखेडे, डॉ. मनोज शेंडे, डॉ. किशोर भट्टाचार्य, शोभा नैनावत, वंदना किन्नाके आणि रमेश घुटके यांनी विविध आरोग्यविषयक बाबींवर मार्गदर्शन केले. जिल्हास्तरावर प्रशिक्षित मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी विविध विषयांवर सैद्धांतिक व प्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी गावातील सुमारे १० ते २५ कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन प्रतिबंधात्मक व उपचारात्मक प्राथमिक आरोग्य सेवांबाबत माहिती देण्यात आली.
दोन दिवसीय प्रशिक्षणात गरोदरपण, प्रसूती व प्रसूतीपश्चात काळजी, नवजात व अर्भक आरोग्य, बालक व किशोरवयीन आरोग्य, कुटुंब नियोजन व प्रजनन आरोग्य, संसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन, सामान्य व किरकोळ आजारांवरील उपचार, असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध व नियंत्रण, डोळे व कानांची प्राथमिक आरोग्य सेवा, मौखिक आरोग्य, वृद्धापकाळ व पॅलिएटिव्ह केअर, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, मानसिक आरोग्य तसेच योग व आयुष पद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.




Petrol Price




