सरकारी नोकरीचे आमिष दाखवून निवृत्त बँक व्यवस्थापकाला पाच लाखांचा गंडा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : तलाठी पदावर सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिरोडा येथील एका सेवानिवृत्त बँक शाखा व्यवस्थापकाची तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नोकरीचे आश्वासन देऊन पैसे घेतल्यानंतर नियुक्तीपत्र देण्याऐवजी टाळाटाळ केल्याचा आरोप असून, या प्रकरणी तिरोडा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १८ मार्च २०२५ रोजी घडली होती.
पृथ्वीराज रामचंद्र मेश्राम (६५), रा. विनोबा भावे वॉर्ड, तिरोडा, असे फिर्यादीचे नाव आहे. तर ईश्वरदास दयाराम राऊत (५४), रा. राजेंद्र वॉर्ड, मोहाडी, जि. भंडारा, टेकचंद बाळा भर्रे (५३), रा. वाडा-फुटाळा, ता. मोहाडी, जि. भंडारा आणि नितीन वसराम राठोड (४५), रा. बेलापूर रेल्वे स्टेशनजवळ, नवी मुंबई, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
तलाठी पदाच्या परीक्षेची पार्श्वभूमी -
महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये तलाठी पदाच्या ४ हजार ६४४ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मेश्राम यांचा मुलगा अभिनव याने या पदासाठी परीक्षा दिली होती. दरम्यान, मेश्राम यांचे नातेवाईक असलेल्या ईश्वरदास राऊत याने टेकचंद भर्रे याचे मंत्रालयात चांगले संबंध असून तो अनेकांना सरकारी नोकरी लावून देत असल्याचे सांगितले. अभिनवचे नाव तलाठी परीक्षेच्या प्रतीक्षा यादीत आणून त्याला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन राऊत याने दिले. त्यानंतर त्याने अभिनवची टेकचंद भर्रे याच्याशी भेट घडवून आणली.
नोकरीसाठी मागितले २२ लाख -
टेकचंद भर्रे याने त्याचा मित्र नितीन राठोड हा मंत्रालयात काम करीत असून त्याचे मंत्रालयात मोठे संबंध असल्याचे सांगितले. अभिनवला तलाठी पदावर नोकरी लावून देण्यासाठी २२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यापैकी अभिनवचे नाव प्रतीक्षा यादीत आणण्यासाठी सुरुवातीला पाच लाख रुपये आगाऊ देण्यास सांगण्यात आले. नोकरी न लागल्यास ही रक्कम परत करण्याचे आश्वासन आरोपींकडून देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे विश्वास ठेवून पृथ्वीराज मेश्राम यांनी १८ मार्च २०२५ रोजी युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून पाच लाख रुपयांचा धनादेश टेकचंद भर्रे याला दिला.
व्हॉट्सअॅपवर पाठविली बनावट प्रतीक्षा यादी? -
पाच लाख रुपये मिळाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी नितीन राठोड याने अभिनवला व्हॉट्सअॅपवर एक प्रतीक्षा यादी पाठविली. या यादीत अभिनवचे नाव असल्याचे दाखविण्यात आले. त्यानंतर राऊत, भर्रे आणि राठोड हे एक-दोन आठवड्यांत नियुक्तीपत्र मिळेल, असे सांगत राहिले. मात्र निर्धारित कालावधीत नियुक्तीपत्र मिळाले नाही. त्यानंतर तिघांकडे वारंवार विचारणा केली असता फोनवरून उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ सुरू केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
दीड वर्ष उलटूनही ना नोकरी, ना पैसे परत -
पाच लाख रुपये दिल्यानंतर अभिनवला प्रतीक्षा यादी, वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले. मात्र दीड वर्षाहून अधिक कालावधी उलटूनही अभिनवला तलाठी पदाचे नियुक्तीपत्र मिळाले नाही. तसेच आगाऊ दिलेली पाच लाख रुपयांची रक्कमही परत करण्यात आली नाही. नोकरी मिळत नसल्याने मेश्राम यांनी संबंधितांकडे पैशांची मागणी केली. मात्र तिघांकडूनही सातत्याने टाळाटाळ करण्यात आल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल -
या प्रकरणी पृथ्वीराज मेश्राम यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी २ तिरोडा पोलिस ठाण्यात ईश्वरदास राऊत, टेकचंद भर्रे आणि नितीन राठोड यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३ (५), ३१८ (४), ३३६ (३), ३३७ आणि ३४० (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींनी सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले का, तसेच व्हॉट्सअॅपवर पाठविण्यात आलेली प्रतीक्षा यादी खरी होती की बनावट, यासह व्यवहाराच्या इतर बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.




Petrol Price




