ब्लॅक फंगसच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या : आयुक्तांना मेसेज पाठवत उचलले पाऊल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था /  बंगलोर :
ब्लॅक फंगसच्या भीतीने दाम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीला कोरोनाची लागण झाल्यावर त्यांना ब्लॅक फंगस होण्याची भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईट नोट लिहिली आहे. त्यात ब्लॅक फंगसच्या भीतीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
रमेश गुणा (40) आणि सुवर्णा गुणा (35) असे आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे. ते मंगलोरमधील बॅकम्पद्यो अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांना कोरोना संक्रमण झाले होते. आम्हाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या पत्नीला मधुमेहाचा त्रास आहे. मधुमेहाचा त्रास असलेल्यांना ब्लॅक फंगसचा धोका असतो. त्यामुळे शरीरातील काही अवयव निकामी होण्याची भीती असते, अशी माहिती वृत्तवाहिन्या आणि इतर ठिकाणांहून मिळाली आहे. त्यामुळे आम्हांलाही ब्लॅक फंगस होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे आम्ही जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यानी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
आम्हांला कोरोनामुळे ब्लॅक फंगसची लागण झाल्यास आणि त्यामुळे एखादा अवयव निकामी झाल्यास त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतील. त्यामुळे आम्ही जीवन संपवत आहोत. त्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे मागच्या आठवड्यात स्पष्ट झाले होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी शहराचे पोलीस आयुक्त एन.शशीकुमार यांना ऑडिओ मॅसेज करून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली होती.
रमेश आणि सुवर्णा यांनी असा निर्णय घेऊ नये, असे टोकाचे पाऊल त्यांनी उचलू नये, असे आवाहन आयुक्त शशीकुमार यांनी त्यांना केले होते. या जोडप्याचा शोध घेत त्यांना मदत करण्याचे निर्देशही शशीकुमार यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. पोलीस त्यांचा शोध घेत अपार्टमेंटमध्ये पोहचले. तेव्हा त्या जोडप्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांना आढळले.
आरोग्याच्या समस्यांमुळे सुवर्णा यांनी अपत्य होण्याची शक्यता कमी होती. त्यांना ओळखीतील अनेकजण याबाबत नेहमी विचारणा करत होते. त्यामुळे हे जोडपे कोणामध्ये जास्त मिसळत नव्हते. आमच्या मृत्यूनंतर शरण पंपवेल आणि सत्यजीत सुरथकल यांनी हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे आमचे अंतिम संस्कार करावेत,अशी विनंती आम्ही त्यांना करत आहोत. त्यासाठी 1 लाख रुपये ठेवल्याचेही त्यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. घरातील वस्तू आमच्या आईवडिलांच्या उपयोगाच्या नसल्याने त्या वस्तू गरिबांना वाटण्यात याव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे. आम्ही या कृत्याबाबत घरमालकांची माफी मगत असल्याचेही त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. अनेकजण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच त्यांना ब्लॅक फंगसची लागणही झालेली नाही. या दाम्पत्याने ब्लॅक फंगसच्या भीतीने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
  Print


News - World | Posted : 2021-08-17


Related Photos