धान पिकात हत्तींचा धुडगूस : विहीरगाव परिसरातील शेतकरी संकटात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : वडसा वन विभागाच्या हद्दीतील विहीरगाव आणि परिसरात रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून या भागात हत्तींचा सातत्याने वावर सुरू आहे. नुकत्याच रोवणी केलेल्या धान पिकांची हत्तींकडून नासधूस केली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
बुधवारी रात्रीसुद्धा रानटी हत्तींच्या कळपाने विहीरगाव परिसरातील शेतांमध्ये प्रवेश करून मोठ्या प्रमाणात धान पिकांची पायदळी तुडवून नासधूस केली. मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वन विभागाने तातडीने हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
विहीरगावसह डोंगरगाव (ह.), चिखली (तु), चिखली (रिठ), पिंपळगाव (ह.) आणि पोटगाव परिसरात हत्तींच्या कळपामुळे दहशतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी हत्ती शेतांमध्ये शिरून धानाची रोपे तुडवत असून, अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्याचे दीड एकर पीक उद्ध्वस्त -
विहीरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी शरद पिलावन यांच्या जवळपास दीड एकर शेतातील धान पिकाची हत्तींनी पूर्णपणे नासधूस केली. या नुकसानीमुळे त्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाई मिळण्याची तसेच हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
टस्कर हत्तीचा गोंदिया जिल्ह्यात प्रवेश -
दरम्यान, कसारीच्या जंगलातून भरकटलेला एक रानटी टस्कर हत्ती गोंदिया जिल्ह्यातील वडेगाव (बंद्या) परिसरात दाखल झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून या भागात त्याचा मुक्काम असून, मानवी वस्तीत प्रवेश करण्याचा धोका निर्माण झाला होता. वडेगाव येथील सेवानिवृत्त वन परिक्षेत्र अधिकारी रमेश घुटके यांनी गावकऱ्यांच्या मदतीने टेंभे (मशाली) पेटवून या टस्कर हत्तीला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले. तसेच याबाबत वन विभागाला तातडीने माहिती देण्यात आली. त्यामुळे संभाव्य धोका टळला.
हत्तींचा बंदोबस्त कधी होणार -
विहीरगाव आणि परिसरातील शेतकरी सध्या हत्तींच्या दहशतीखाली आहेत. वारंवार होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करून हत्तींचा बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.




Petrol Price




