महत्वाच्या बातम्या

 ट्रॅव्हल्सने प्रवास करत अवैध दारूची वाहतूक : LCB च्या कारवाईत दोन महिला ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : प्रवासी ट्रॅव्हल्सने प्रवास करत विदेशी दारूची अवैध वाहतूक करण्याचा प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. नागपूरहून चंद्रपूरकडे येणाऱ्या गणराज ट्रॅव्हल्समधून बॅगेत विदेशी दारूच्या बाटल्या लपवून आणणाऱ्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने प्रियदर्शनी चौकात सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत ३६ हजार ७३० रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या २३५ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.

शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रियदर्शनी चौकात नाकाबंदी करून नागपूरहून येणाऱ्या गणराज ट्रॅव्हल्सची (क्रमांक MH ४९ AT १६९६) तपासणी केली. यावेळी दोन महिला प्रवाशांच्या बॅगांची पंचांसमक्ष झडती घेतली असता, त्यामध्ये बॉम्बे व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या ४० सीलबंद बाटल्या आणि ऑफिसर चॉईस व्हिस्कीच्या ९० मिली क्षमतेच्या १९५ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी हा संपूर्ण दारूसाठा जप्त केला.

या प्रकरणी राजकुमारी धीरज जाट (वय ३६) आणि शिवरात्री संजय जाट (वय ५९), दोघीही रा. बेलगाव, केंजर मोहल्ला, जबलपूर, मध्य प्रदेश, यांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या महिला नागपूर येथून विदेशी दारू आणून चंद्रपुरातील प्रिन्स केंजर याला विक्रीसाठी देणार होत्या. या प्रकरणातील प्रिन्स केंजर हा पाहिजे आरोपी असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

प्रवासी ट्रॅव्हल्सने सामान्य प्रवाशांप्रमाणे प्रवास करत बॅगेतून अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याने या प्रकाराचे गांभीर्य वाढले आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) आणि ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर उपविभागाच्या पथकाने केली.





  Print






Related Photos